आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिडको- अंबडला काही दिवसांपूर्वी देशी दारू दुकानाविरोधात महिलांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते. यात महिलांनी थेट पोलिस ठाण्यावर माेर्चा काढून निवेदन देत दुकान बंद करण्याची मागणी केली होती. स्थानिक भाजप नगरसेवकाने याला पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. १८) या दुकानाला पुन्हा टाळे ठोकले. विशेष म्हणजे यावेळी आंदोलनात एकही महिला नव्हती. यामुळे या दुकानावरून श्रेयवादाचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.
प्रभाग क्रमांक २७ मधील रौंदळ देशी दारू दुकान बंद व्हावे यासाठी महिलांनी रस्त्यावर आंदोलन केले होते. भाजपचे नगरसेवक राकेश दोंदे यांनी आंदोलनाला पाठिंबा देत हे देशी दारू दुकान बंद केले होते. त्यानंतर दुकानदाराने पुन्हा दुकान सुरू केले. त्यामुळे हे दुकान बंद करण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांचे पती बाळा दराडे यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग पत्करला. मात्र, यावेळी करण्यात अालेल्या आंदोलनात एकही महिला नव्हती. दुकानाला टाळे ठोकत या विषयाला राजकीय वळण दिल्याने देशी दारू दुकानावरून श्रेयवादाचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.
आम्ही दुकानाला टाळे ठोकले
अंबड येथील देशी दारू दुकान बंद व्हावे ही नागरिकांची मागणी होती. आम्ही त्यासाठी दुकानाला टाळे ठोकले. यानंतर दुकान बंद झाल्यास मोठे आंदोलन उभारू.
- बाळा दराडे, नगरसेविकेचे पती.
कायदेशीर मार्गाने आंदोलन करावे
हे दुकान बंद व्हावे ही महिलांची मागणी होती. आणि म्हणून त्या रस्त्यावर उतरल्या होत्या. आम्ही त्यांना पाठींबा दिला होता. आता काही लोक श्रेय घेण्यासाठी प्रसिद्धीसाठी आंदोलन करीत आहेत.
- राकेश दोंदे, नगरसेवक, भाजप.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.