आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनडा कॉर्नर चौकाला बाधा प्रदूषणाची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- व्यावसायिक संकुलांची मांदियाळी असलेल्या कॅनडा कॉर्नर परिसरात संबंधित व्यावसायिकांना स्वत:च्या पार्किंग व्यवस्थेचा विसर पडला आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठय़ा संख्येने वाहने उभी राहून वाहतुकीचा खोळंबा होतो.
परिणामत: हा संपूर्ण परिसर दिवसभर वाहनांचे कर्णकर्कश आवाज व प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. येथील रस्ता 18 मीटरचा असला तरीही पदपथ व त्यापुढील वाहने बघता सुमारे आठ मीटरपर्यंतचा रस्ता त्यातच व्यापतो. परिणामी, नागरिकांना 10 मीटरचाच रस्ता वापरायला मिळतो. शरणपूर वाहतूक पोलिस
चौकी ते जुना गंगापूरनाका या परिसराचा हा आढावा..

असा आहे रस्ता
शरणपूर पोलिस चौकीपासून सुरू होणारा रस्ता हॉटेल एमराल्ड पार्क, पोलिस आयुक्त कार्यालय, कॅनडा कॉर्नर, वसंत मार्केट असा जात जुना गंगापूर नाका सर्कलला मिळतो. रस्ता 18 मीटरचा असून, दुतर्फा चार मीटरचे फुटपाथ व त्यापुढे चार मीटरपर्यंतच्या जागेत उभी राहणारी वाहने यामुळे प्रत्यक्षात वाहने चालविण्यासाठी शिल्लक राहतो तो केवळ 10 मीटरचाच रस्ता. या परिसरातील व्यावसायिक संकुलांमुळे नेहमीच वर्दळ असते. त्यातच रस्ते अनधिकृत पार्किंगमुळे व्यापले गेल्याने वाहतुकीच्या भयंकर कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते.

सिग्नलची वळणेही जाम
वाहतुकीचा सर्वाधिक खोळंबा होतो तो कॅनडा कॉर्नरवर. सीबीएसकडून पोलिस आयुक्तालयाकडे जाताना कॅनडा कॉर्नरच्या वळणावरच वाहने पार्क केली जात असल्यामुळे पोलिस आयुक्तालयाकडे जाणार्‍यांनाही हा सिग्नल सुटण्याची वाट पाहावी लागते. वास्तविक, या बाजूला जाणार्‍यांना सिग्नलवर थांबण्याची आवश्यकताच नसते. याशिवाय, दुसर्‍या बाजूला बीएसएनएलचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाहेरही वाहने उभी असतात. सिग्नलच्या चारही बाजूस हीच अवस्था आहे.

अतिक्रमणांचे ग्रहण
सावजी पेपर स्टॉलच्या समोरच्या बाजूस असलेल्या रस्त्यालादेखील सध्या अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. या रस्त्याच्या फुटपाथवर खाद्यपदार्थांच्या टपर्‍या टाकण्यात आल्या असून, या भागातही वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

आयुक्तालयाबाहेर मोकळे
कॅनडा कॉर्नर परिसरात वाहतुकीच्या सर्वच नियमांना बगल दिली जात असताना, पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर मात्र फुटपाथवर एकही वाहन उभे दिसत नाही.

केवळ पोलिस आयुक्तांचे कार्यालय आहे म्हणून येथे नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात असल्याचे दिसते. ही परिस्थिती अन्य मार्गांवरदेखील असावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नाशिककरांकडून व्यक्त केली जाते आहे.

फुटपाथची येथेही ‘वाट’
शहरातील अन्य भागांप्रमाणेच या परिसरातही फुटपाथवरच वाहने उभी केली जातात. बहुतांश दुकानदारांनी पार्किंगसाठी जागाच ठेवलेली नसल्याने ग्राहक एकतर फुटपाथवर वाहने उभी करतात किंवा थेट रस्त्यावर. त्यामुळे वाहने चालविण्यासाठी वापरात येणारा रस्ता अधिक अरुंद होतो.

तर झाडे तोडावी लागणार नाही
स्वामी सर्मथ सर्कलपासूनच्या पुढच्या बाजूचे सर्वच रस्ते हॉटेल चालकांनी व्यापले आहे. या हॉटेल्सने नियमाप्रमाणे पार्किंगला जागा उपलब्ध करून दिल्यास रस्ता रुंदीकरणाची वा झाडे तोडण्याची गरज भासणार नाही. सतीश घैसास, सोमेश्वर

मधुरा पार्क येथे अतिक्रमण
उंडवाडी परिसरातील मधुरा पार्क येथे एका वास्तुतज्ज्ञाने अतिक्रमण केले आहे. याबाबत महापालिकेत नियमाप्रमाणे तक्रारही केली आहे. संजय कावळे, उंटवाडी

पार्किंगची व्यवस्था असावी
कॅनडा कॉर्नर परिसरात रोजच आपली वाहने पार्क करून लोक निघून जातात. त्याचा त्रास वाहनचालकांना होतो. या परिसरात स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था असावी. नेहा चांडक, रहिवासी

परिसरात भांडणे वाढली
नंदन कॉर्नर ते भोसला सर्कलचा भाग व या सर्कललगतचा परिसर हॉटेल्सनी भरलेला आहे. त्यांची बहुतांश वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो; शिवाय परिसरात रोजची भांडणेही वाढली आहेत. - स्वप्नील पाटील, डिसूझा कॉलनी

जुन्या नियमांच खोळंबा
महापालिकेचे जुने नियम काळानुरूप न बदलल्याने वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागते आहे. नियमातील पळवाटांमुळे अतिक्रमणधारकांचे फावते. राजीव डेर्ले, जेलरोड

वळणावर इंधनाची नासाडी
रस्त्यावरील वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघात घडतात. कॉलेजरोडकडून कॅनडा कॉर्नरकडे वळताना तेथे नेहमीच वाहतूक खोळंबलेली दिसतेच. त्यामुळे इंधनाचीही नासाडी होते. सायली रावत, विद्यार्थी