आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक शहरातील हवा-पाणी चांगले; ध्वनिप्रदूषण वाढले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेने सन 2013 या वर्षात नाशिक शहरातील हवा, ध्वनी व वायू प्रदूषणाचा अभ्यास अहवाल जाहीर केला असून, यात नाशिकची हवा चक्क चांगली असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. ध्वनिप्रदूषणात मात्र वाढ झाली असली तरी गत दोन वर्षांच्या तुलनेत प्रमाण कमीही झाले आहे. गोदावरीत मिसळणा-या सांडपाण्यामुळे जलजन्य आजाराची भीती व्यक्त केली आहे.
महासभेवर पर्यावरणविषयक अहवालाला गुरुवारी मान्यता देण्यात आली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील पर्यावरणाचा मुद्दा गेल्या काही दिवसापासून गाजत आहे. खासकरून गोदावरी प्रदूषणावर तर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शहरातील वाहनांची वाढत्या संख्या व त्यामुळे निर्माण होणा-या वायु प्रदूषणावर पर्यावरणविषयी संस्था आक्रमक झाल्या आहेत. अशातच या अहवालात चक्क शहरात हवा प्रदूषण नसल्याचा दावा करण्यात आला आहे. गोदावरी प्रदूषणाबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापलेल्या समितीने तर त्यावर उपायही सुचविले आहेत.

अशी आहे स्थिती
हवा : हवेची गुणवत्ता चार ठिकाणी तपासण्यात आली. यात गोल्फ क्लब येथील जलसंपदा विभाग वसाहतीजवळ निर्देशांक 39.21 इतका आढळला. राजीव गांधी भवनजवळ 37.83 उद्योगभवनाजवळ 36.10 तर व्हीआयपीजवळ 43.8 असे प्रमाण होते. आदर्श निर्देशांकानुसार 0 ते 20 या वर्गवारीला उत्कृष्ठ ते 21 ते 40 वर्गवारीला चांगला असे संबोधले जाते.
ध्वनी : ध्वनिप्रदूषणाचे डेसिबलमध्ये मोजमाप केले जात असून, बाजारपेठ व निवासी अशा दोन क्षेत्रातील मापन करण्यात आले. त्यात निवासी विभागात दिवसा 55 डेसिबल पातळी अपेक्षित असताना 68 इतकी वाढ झाली. रात्री 45 डेसिबल अपेक्षित असताना 66 डेसिबल पातळी आढळली. बाजारपेठेत दिवसा 65 डेसिबल अपेक्षित असताना येथे 75 इतकी तर रात्री 55 डेसिबलऐवजी 73 डेसिबल आढळली आहे.
पाणी : शहरातील विविध भागातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्यातील 9847 नमुन्यांपैकी 9692 पाणी नमुने पिण्यायोगे आढळले. त्याची टक्केवारी 98.42 इतकी असून, गेल्या दोन वर्षांचा विचार करता एक टक्क्याने पाण्याची गुणवत्ता ढासळली आहे.
प्रतिबंधासाठी उपाय
- नाशिक शहरातील कारखाने व परिसरात हवा प्रदूषण नियंत्रक बसवणे. त्यात स्कबर्स व प्रिसीपीटरचा समावेश करावा.
- हवाप्रदूषणावर वर्षभर सर्वंकष देखरेख ठेवणे व ऋतुमानानुसार नोंदी ठेवणे.
- वाहतूक व्यवस्थेशी समन्वय साधून पी.यु.सी. सर्टिफिकेट बंधनकारक करणे.
- सिग्नल यंत्रणेवर काउंटडाउन यंत्रणा बसवणे
- महापालिका क्षेत्रात वृक्षारोपण वाढवणे.
- शहरात होणारे धार्मिक उत्सव, लग्नातील वाजंत्री, डीजे व अन्य वाद्यांवर बंदी घालणे किंवा कायद्यानुसार कमी आवाजात वाद्य वाजविण्यास परवानगी द्यावी.
- शांतता क्षेत्र अर्थातच सायलेंट झोनची संख्या वाढवणे. सद्यस्थितीत शहरात 19 शांतता क्षेत्र आहेत.
- गाडीवरील कर्णकर्कश हॉर्न बंद करणे किंवा ट्रॅफिक जंक्शनवर बंद करणे.
- स्वयंसेवी संस्था, विविध प्रसारमाध्यमांकडून जनजागृती करावी.
- प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडू नये.
- कारखान्यातील रासायनिक द्रव्य जागेवरच नष्ट करावे.
- जलशुद्धीकरणात क्लोरिन व तुरटी वापरावी.
- नदीमध्ये टाकले जाणारे निर्माल्य, गोदापात्रात वाहने धुणे व स्नानाला प्रतिबंध करावा.