आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड हजार मासे मृत्युमुखी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-गोदावरीतील बोटिंग क्लबजवळ शनिवारी (दि. 22) सकाळी सुमारे दीड हजार मासे मृतावस्थेत आढळले. या वेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. दीड वर्षापूर्वी याच ठिकाणी मोठय़ा प्रमाणात माशांचा मृत्यू झाला होता. पाण्यात पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे, तसेच विषारी द्रव्यांमुळेच ही घटना घडल्याचे त्यावेळी निष्पन्न झाले होते. आता पुन्हा अशीच दुर्घटना घडल्याने प्रदूषणाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सावरकरनगर परिसरातील आसारामबापू पुलाजवळ बोटिंग क्लब आहे. याच ठिकाणी मासे मृत झाल्याची घटना खंडेराव धोंगडे, कैलास गोरे यांच्यासह काही जागरूक नागरिकांमुळे उघडकीस आली. ही माहिती समजताच परिसरातील अनेक नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली. दीड वर्षापूर्वी याच ठिकाणी शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी धाव घेऊन तेथील पाण्याचे नमुने गोळा करून ते परीक्षणासाठी पाठविले होते. त्यात पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने गुदमरून माशांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच, पाण्यात काही घातक रसायने असल्याचेही निष्पन्न झाले होते. त्यावेळी अवेळी झालेल्या पावसाच्या माध्यमातून ही रसायने गोदावरीमध्ये मिसळल्याचेही सांगण्यात आले होते. आताही याच परिसरात सुमारे दीड हजार इतक्या मोठय़ा संख्येने मासे मृतावस्थेत तरंगताना आढळून आले.
मासे विक्रीसाठी बाजारात नेले
मासे विक्री करणार्‍या काही व्यावसायिकांनी या संधीचा फायदा घेत मृत मासे गोळा करून विक्रीसाठी नेल्याचे तेथील काही उपस्थित नागरिकांनी सांगितले. नागरिकांनी त्यांना हटकले असता, गोळा केलेले मासे घेऊन संबंधितांनी तेथून पळ काढला. यामुळे मृत माशांची बाजारात विक्री करण्यात आल्याचा संशय आहे. बोटिंग क्लबचे अध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत मते यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी जागेवर जाऊन पाहणी केली. त्यांनी पालिकेचा पर्यावरण विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना दूरध्वनी केला असता, एकाही अधिकार्‍याने प्रत्युत्तरादाखल दूरध्वनी करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला नाही, असे मते यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. जवळपास दीड हजार मासे मृतावस्थेत दिसले. महिन्याचा चौथा शनिवार हा सुटीचा वार असल्याने अधिकारी आले नाहीत. मासे मृत झाल्याच्या ठिकाणाच्या अलीकडेच गोदावरीत सांडपाणी मिसळणारा नाला आहे. त्यातून सातपूर औद्योगिक वसाहतीतून वाहत येणारे पाणी मिसळत असते. यामुळे कदाचित रसायनमिर्शित पाण्यानेच माशांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज मते यांनी व्यक्त केला.