आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाॅलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी केली ‘मल्टिपर्पज एक्सरसायझिंग मशिन’ची निर्मिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या महावीर पॉलिटेक्निकमधील मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या सुयोग भांबर, प्रतीक गायकवाड, हर्षल वेलाणी वीरेंद्र तळेले या विद्यार्थ्यांनी ‘मल्टिपर्पज एक्सरसायझिंग मशिन’ची निर्मिती केली. या मशिनवर क्रॉस ट्रेनिंग म्हणजेच दंडाचे, कंबरेचे, मांड्यांचे पोटरीचे व्यायाम तर करता येतातच, शिवाय स्टॅण्डिंग बायसिकल म्हणजेच सायकलसारखे पेडलिंग करून जास्तीत जास्त अंतर एक जागी बसून प्रवास करता येतो. 
 
विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या मशिनवर रोटेटिंग सीट आणि रोटेटिंग डिस्क लावलेली असल्यामुळे कमरेचे मणक्याचे व्यायामही या मशिनद्वारे करता येणे शक्य आहे. या मशिनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मशिनवर हॅण्ड स्ट्रेचरचा व्यायामही शक्य असून, मशिनला कॅलरीज मीटर लावण्यात आले असून मशिनद्वारे निर्मित मेकॅनिकल एनर्जीचे रूपांतर विद्युत एनर्जीमध्ये घडवून या ऊर्जेपासून कॅलरी मीटर चालते. मोबाइल चार्जिंग, एलसीडी, टीव्ही, विजेचा दिवा आदी उपकरणे व्यायाम करताना चालू शकत असल्याने ते सर्वसामान्य नागरिकांसाठी अधिक फायद्याचे ठरणार असल्याचे मत विद्यार्थी प्रतिनिधी सुयोग भांबरने व्यक्त केले. सहा फूट बाय अडीच फूट एवढ्या जागेत जास्तीत जास्त व्यायाम प्रकार आणि प्रत्येक व्यायामासाठी वेगवेगळी मशिन विकत घेता केवळ पाच हजार रुपयांत या मशिनची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांना श्री महावीर पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख संभाजी सगरे आणि प्रा. राजीव शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. 
बातम्या आणखी आहेत...