आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रपेट्यांचे ‘वाजले की बारा’; 20 लाख नाशिककरांसाठी केवळ 100 पोस्टमन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

"स्वातंत्र्यपूर्व काळापासून संदेश देवाण-घेवाण असो की, महत्त्वाची कागदपत्रे पोहोचविण्यासाठीचे विश्वासपात्र माध्यम म्हणून ‘टपाल खात्या’कडे पाहिले जाते. या खात्यालाच आता ‘घरघर’ लागली आहे. खात्याची अवस्था मरणासन्न झाली असून, कागदपत्रे गहाळ होणे, मुदतीत न मिळणे, पत्रपेट्या चार-चार दिवस न उघडणे अशा एक ना अनेक समस्यांच्या गर्तेत खाते अडकल्याने याचा चांगलाच फायदा खासगी कुरिअर सेवांना मिळत आहे. बदलत्या काळात आणि तंत्रज्ञान युगातही टपाल खात्याचे महत्त्व अबाधित राहावे व खात्याला नवसंजीवनी मिळावी, यासाठी शासकीय यंत्रणा झगडत असली तरी अपुरे मनुष्यबळ आणि कार्यक्षमतेच्या अभावामुळे टपाल खाते इतिहासजमा होण्याची भीती निर्माण झाली आहे. याचा डीबी स्टारने घेतलेला आढावा.."

केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या टपाल खात्यात अत्याधुनिक सुधारणा केल्या जात असल्या तरी टपाल खात्याला पूर्वीप्रमाणे वैभव प्राप्त होत नसल्याने या खात्याच्या अधिकारी-कर्मचार्‍यांकडूनच नाराजी व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागापासून ते महानगरापर्यंत शासकीय दस्तावेज, नोकरीसाठीचे अर्ज, प्रवेशअर्ज, स्पर्धा परीक्षा फॉर्म पाठविण्यासाठी ज्यांचा वापर केला जातो त्या टपाल कार्यालये आणि पत्रपेट्यांची दयनीय अवस्था आहे. शहरातील जिल्हा परिषद कार्यालयानजीकचे मुख्य टपाल कार्यालय व नाशिकरोड येथील शिवाजी पुतळ्याजवळील कार्यालय वगळता इतर उपकार्यालये व पत्रपेट्यांना सर्वत्र जळमटे आलेली दिसतात. वर्षानुवर्षे जुने झालेले रेकॉर्ड माळ्यावर पडलेले दिसत असून, संगणकीकरणाच्या युगातही कार्यालयांमध्ये कागदांचे गठ्ठेच गठ्ठे आढळून येतात.

टपाल खात्याला अजूनही महत्त्व
टपाल कार्डांची जागा मोबाइलच्या मेसेजने घेतली आहे. स्पर्धा परीक्षांचे अनेक प्रवेशअर्ज असो की, वेगवेगळ्या खात्यातील पदांच्या भरतीचे अर्ज दाखल करण्यासाठी युवकांची टपाल कार्यालयात झुंबड उडत असते. पोस्टाच्या ठेव योजना, किसानपत्र, आवर्ती ठेव योजनांचे हप्ते भरण्यासाठी पीपीएफसारख्या योजनांसाठी नोकरदार कार्यालयात येतात. तसेच, पासपोर्ट, प्रादेशिक परिवहन विभागाचे लायसन आणि शासकीय कार्यालये, खासगी कार्यालयांकडून नोकरीच्या उमेदवारांना कॉल लेटरदेखील टपाल खात्यामार्फतच पाठविले जाते, यावरून त्याची विश्वासार्हता टिकून राहिली आहे.

पत्रपेट्यांना लागली गळती
शहरातील विविध भागात 200 हून अधिक पत्रपेट्या आहेत. यापैकी बोटांवर मोजण्याइतक्या 50 ते 60 पत्रपेट्यांची अवस्था चांगली आहे. टपाल कार्यालयातील उपकेंद्रांच्या आवारात असलेल्या भागातच चांगल्या स्थितीत पत्रपेट्या दिसून आल्या, तर उर्वरित बहुतांशी पत्रपेट्यांची अवस्था अतिशय दयनीय अशीच दिसून आली. काही पत्रपेट्यांना तळाशीच मोठे भगदाड पडलेले असून, यात पत्र टाकताच ती खाली पडतात, तर काही पेट्या नावालाच उरल्या असून, त्याच्यावरील पत्रादेखील जीर्ण झालेला दिसून येतो. पावसाळ्यात तर हमखास टपालपेटीतील कागदपत्रे भिजत असले तरी त्याकडे टपाल कार्यालयाकडून दुर्लक्ष केले जाते. काही पेट्यांना कचराकुंड्यांचे स्वरूप प्राप्त झाले असून, काहींवर तर गुटख्याच्या पिचकार्‍याही दिसून येतात. काही पत्रपेट्या गंजलेल्या अवस्थेत असून, काही हौशी नगरसेवकांनी त्यावर रंग देण्याचा प्रयत्न केला खरा; मात्र त्यांच्या या प्रयत्नात पेटीवरील टपाल काढण्याच्या वेळा नसल्याने नागरिकांची गैरसोय होताना दिसून येते. नाशिकरोड येथील दत्तमंदिर चौक, बिटको पसिसर, सारडा सर्कल, सिडकोतील पवननगर, स्टेट बँक चौक, लेखानगर टपाल कार्यालय, अंबड पोलिस ठाण्यासमोरील पेटी, त्रिमूर्ती चौक, सातपूरमधील कामगार वसाहत, हाउसिंग सोसायटीतील पत्रपेटी, पंचवटीतील पेठरोड, गंगापूररोड परिसरात, जुने नाशिक, देवळाली गावात, म्हसोबा मंदिरासमोर वरच्या मजल्यावर टपाल कार्यालय असल्याने नागरिकांची गैरसोय होते. देवळाली कॅम्प भागातील पत्रपेट्यांचाही यात समावेश आहे.

कामाचा वाढता ताण आणि मनुष्यबळाची कमतरता
नाशिक शहराचा चौफेर व झपाट्याने विकास होत असून, सर्वत्र नववसाहती स्थापन होत आहेत. शहराची लोकसंख्या सुमारे 20 लाखांच्या घरात पोहोचली असताना, साधारणत: महापालिका हद्दीच्या क्षेत्रात सात लाखांपर्यंत घरांची संख्या आहे. मात्र, टपालवाटप करणार्‍या पोस्टमनची संख्या केवळ 95 ते 100 इतकी आहे. नाशिक विभागात एकूण 183 पोस्टमन असले तरी त्यांचे कार्यक्षेत्र शहराबाहेरील चार तालुके, 200 हून अधिक खेड्यांचा समावेश आहे. त्यामुळे एकेका पोस्टमनला किमान पाच ते सात किलोमीटरपर्यंत अंतर दररोज कापावे लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भाड्याच्या जागेत सुरू आहेत शहरात टपाल कार्यालये
शहरात मुख्य टपाल कार्यालय व नाशिकरोड कार्यालयासह आणखी दोन कार्यालये वगळता किमान 10 ते 12 उपकार्यालये भाड्याच्या जागेत भरतात. यात अशोकनगर, औद्योगिक वसाहतीतील, सिडको, गंगापूररोडवरील टपाल कार्यालयाची अवस्था दयनीय झाली आहे. महापालिकेच्या गाळ्यांमध्ये तर खासगी जागांमध्ये टपाल कार्यालयांसाठी महिन्याला किमान 50 ते 60 हजारांपर्यंत भाडे द्यावे लागत आहे. दरम्यान, टपाल खात्यासाठी महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी आरक्षित भूखंड मोक्याच्या जागी असतानाही खात्याकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. या जागांवर बांधकाम करण्यासाठी आणि नवीन टपाल पेट्यांसाठी निधीच उपलब्ध होत नसल्याचे अधिकार्‍यांकडून सांगितले जाते.

थेट प्रश्न...
मनुष्यबळ कमी तरी नियोजनबद्ध- आर. व्ही. पालेकर, सहायक अधीक्षक टपाल खात्याचे


काही नवीन योजना अमलात येत आहेत का?
टपाल खात्याचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक प्रयत्न होत आहेत. नवनवीन योजनांचा समावेश आहे. स्पीडपोस्ट, रजिस्टरपोस्टला चांगला प्रतिसाद आहे.

पत्रपेट्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे का?
शहरात वर्षानुवर्षे जुन्याच टपालपेट्या असल्या तरी काही ठिकाणी नगरसेवक, नागरिकांच्या मागणीनुसार नव्याने टपालपेट्या बसविण्यात आल्या आहेत. नागरिकांची मागणी झाल्यास लागलीच पेट्या देण्यात येत आहेत.

टपालपेट्या खराब झाल्याने विपरीत परिणाम होतो का?
पत्रपेट्यांमध्ये जमा होणार्‍या टपालाचे प्रमाण 40 टक्क्यांनी कमी झाले आहे. टपाल काढण्यासाठी व वाटपासाठी स्वतंत्र आरएमएस यंत्रणा राबविली जाते.

घरपोच टपाल पोहोचवण्यात अडथळा येतो का?
टपाल खात्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसले तरी नियोजनबद्ध कामकाज चालते. नागरिकांनी योग्य पत्ते दिल्यास पोस्टमन वेळेत पोहोचतो. तसेच, आरटीओचे लायसन असो की पासपोर्टदेखील संबंधित कार्यालयाकडून प्राप्त होताच घरपोहोच पोहोचविले जाते.

केंद्र सरकारकडे पाठपुरावा
तपूर कॉलनीत 1000 चौरस मीटरचा भूखंड म्हाडाने टपाल खात्यासाठी आरक्षित ठेवला आहे. मात्र, गेल्या 30 ते 32 वर्षांपासून या जागेवर कुठलेही बांधकाम करण्यात आलेले नाही. यासाठी वारंवार टपाल खात्याकडे लेखी निवेदने देत थेट केंद्र सरकारपर्यंत पाठपुरावा करण्यासाठी खासदारांना साकडे घालण्यात आले आहे. अशोकनगर येथे 10 बाय 10 च्या खोलीत भाडेतत्त्वावर टपाल कार्यालय चालविले जात असून, यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
- सलीम शेख, नगरसेवक