नाशिक - शहरातील वाहतूक काेंडीचे मुख्य कारण म्हणजे थेट रस्त्यावरच वाहने उभी करण्यात दडले असल्यामुळे अाता महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी मुख्य रस्त्यालगत असलेल्या पालिका वा खासगी जागेवर ‘पीपीपी’ तत्त्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) वाहनतळे सुरू करण्याचा निर्णय घेतला. या वाहनतळांसाठी जागा निश्चितीचे काम झाले असून, खासगी ठेकेदारामार्फत विशिष्ट शुल्क अाकारून वाहनतळ सुरू करण्याबाबत महिनाभरात महासभेवर प्रस्ताव ठेवला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
वर्षभरापासून पालिकेकडून वाहतूक काेंडीच्या समस्येवर उपाय याेजण्याचे प्रयत्न सुरू अाहेत. प्रामुख्याने दूरदृष्टी ठेवून यापूर्वी वाहनतळांच्या जागा साेडल्या गेल्या नाहीत. तसेच, जुन्या कायद्याप्रमाणे इमारतीला वाहनतळासाठी जागा साेडण्याची मर्यादाही अत्यंत कमी हाेती. त्यावेळी वाहनांची संख्या कमी असल्याचेही प्रमुख कारण हाेते. मात्र, अाता प्रतिकुटुंबामागे सरासरी एक वाहन असल्याने त्याचा ताण रस्त्यावर येत अाहे. मुख्य बाजारपेठेत वाहने रस्त्यावर उभी करण्याची वेळ येत अाहे. परिणामी, काेंडी वाढत अाहे. या पार्श्वभूमीवर अायुक्तांनी अाता पालिकेच्या जागेवर खासगी जागेवर वाहनतळ सुरू करण्याचा निर्णय घेतला अाहे.
असे असेल वाहनतळ
रस्त्यालगतच्याजागेवर बूम बॅरिअर या तंत्रज्ञानाचा वापर करून काही छाेटी वाहनतळ तयार केली जाणार अाहेत. माेठ्या जागेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे ई-पावतीद्वारे नियमन हाेणारी वाहनतळे उभारली जातील. प्रत्येक वाहनाची नोंद हाेऊन त्यातून काेणतीही चाेरी करता येणार नाही रस्त्यात वाहने उभी करण्याचे प्रकारही हाेणार नाहीत, याचीही तजवीज राहील. प्रामुख्याने अायुक्तांनी कुंभमेळ्यानंतर अमेरिकेत कुंभथाॅनतर्फे झालेल्या सत्कार साेहळ्यावेळी पीपीपीवरील वाहनतळाची पाहणी केली हाेती. त्यानुसार नाशिकमध्ये अशी वाहनतळे कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असेल.
काही जागा निश्चित
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या साेडवण्यासाठी ‘पीपीपी’ तत्त्वावर वाहनतळे उभारण्याची चाचपणी झाली असून, काही जागा निश्चित केल्या अाहेत. त्याची दर अाकारणी एकूणच कार्यप्रणालीबाबत महासभेला विश्वासात घेऊन अंतिम स्वरूप दिले जाईल. - डाॅ. प्रवीण गेडाम, अायुक्त,महापालिका