नाशिक - परदेशातील कंपनीमध्ये गुंतवणूक करत अल्प कालावधीत दामदुप्पट रक्कम देण्याचे अामिष दाखवत शहरातील नामवंत व्यावसायिकांना कोट्यवधीचा गंडा घालणारा संशयित प्रदीप वाघ यास गुन्हे शाखा युनिट आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने घोडबंदररोड येथे बेड्या ठोकल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांना चकवा देत होता. संशयित वाघ यास अटक झाल्याने या घोटाळ्यातील आणखी नवा खुलासा होण्याची शक्यता आहे.
संशयित वाघच्या परदेशातील अबुथान आणि ब्राइट सिनो या कंपन्या बनावट असल्याचे तपासात उघड झाले होते. परदेशात कमाेडिटी मार्केटमध्ये रक्कम गुंतविल्यास महिन्यात दुप्पट रक्कम करण्याचे अामिष दाखवत प्रदीप वाघ याने शहरातील हुकूमत वालेचा यांच्यासह ४० ते ५० नामवंत व्यावसायिक उद्योजकांना काही कोटींना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी वालेच्या यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांत चिटफंड अायटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा युनिट चे सहायक निरीक्षक प्रवीण साळुंके यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार संशयित वाघ घोडबंदररोड येथे राहत होता. रविवारी सकाळी पोलिसांनी घोडबंदररोड येथे वाघच्या मुसक्या आवळल्या. संशयित वाघला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मोठ्या आर्थिक अपहाराच्या गुन्ह्यातील पहिलाच संशयित जेरबंद झाला असला तरी केबीसी, इमू या कंपन्यांचे संचालक अद्याप पोलिसांना चकवा देत आहेत.