आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्सेप्ट करून जीवन जगलो- प्रकाश आमटे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आदिवासींसाठी काम करताना नैराश्य येण्याचा प्रश्नच नव्हता. कारण आम्हाला त्यांनी इथे बोलावलं नव्हतं, तर त्यांच्यासाठी काम करण्याचा निर्णय आमचा होता. आम्हाला बाबांनी दिशा दाखवली आणि आम्ही चालत गेलो. आता हे काम करत असताना अनेकांना वाटतं की आम्ही खूप खडतर आयुष्य काढलं, पण आम्ही खडतर नाही, तर ती परिस्थिती अॅक्सेप्ट करून जगलो. म्हणूनच समाधानाचे क्षण अनुभवले आणि आमच्या परीने बदल घडवू शकलो, असा प्रामाणिक संवाद डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांनी उपस्थितांशी साधला.

समकालीन प्रकाशनच्या नाशिक कार्यालयाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयएमएच्या विद्यमाने डॉ. आमटेंची मुलाखत घेण्यात आली. या वेळी मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, वनाधिपती विनायकदादा पाटील, समकालीनचे आनंद अवधानी, डॉ. सुहास कुलकर्णी आदी उपस्थित होते. डॉ. शशांक कुलकर्णी आणि डॉ. निरजा कणीकर यांनी आमटे दांपत्याला बोलते केले. या प्रश्नांना त्यांनी हातचे राखता उत्तरे देत उपस्थितांशी बातचीत केली ती त्यांच्याच शब्दात...

मंदाताई आज ४१ वर्षांनंतर तुम्हाला त्या परिसरात काय बदल जाणवतो?
आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा त्या लोकांचा आमच्यावर विश्वासच नव्हता. पण त्यांच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे या विचाराने आम्ही गेलो होतो. त्यांनी बोलावलेले नव्हते हे लक्षात होते. त्यामुळे आधी आम्ही त्यांची जगण्याची पद्धती शिकलो. त्यांचा मांत्रिकावर प्रचंड विश्वास होता त्यापासून त्यांना दूर करण्याचे आव्हानच होते. आता बराच बदल झाला आहे. टीव्ही, मोबाइल आले. विशेष म्हणजे आता ते कपडे घालायला लागले. त्यांच्या शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आता ते काम आमची सून अनघा बघते.

त्याकाळात संघटन, मैत्र, मानसिक स्थैर्य कसं ठेवलं?
आम्हीदाेघांनी तेथे काम करण्याचा निर्णय घेतला होता. माझ्यामुळे हिने निर्णय घेतला होता. आमच्या बरोबर कुमार शिराळकर, विलास मनाेहर, पांचाळ, जगन्नाथ, रेणुका, गोपाळ फडणीस, येम्पलवार हे बाबांच्या प्रेरणेने आलेेले होते. त्यांना नैराश्य येऊ नये, ही जबाबदारी आमची होती. सगळे वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे समवयीन त्यामुळे मतभेद होण्याची शक्यता. पण आम्ही संयम शिकलो.

नवीनपिढीबरोबर काम करताना काय अनुभव आहेत?
आमचामुलगा डॉक्टर होऊन परत आला. त्यानेही काम करण्याची इच्छा दाखवली तो क्षण सर्वात आनंदाचा होता. पण बाबांचा (बाबा आमटे)विश्वास नव्हता. ते त्याला म्हणाले उद्या सभा आहे. ५००० लोकांपुढे हे म्हण म्हणजे माझा विश्वास बसेल. तेव्हापासून आमची तिसरी पिढी या कामात आहे. सुना मिळत नव्हत्या, रोहिणी मासिकात त्याचे नाव घातले. अडीच वर्षांनी लग्न झालं. आता दवाखाना संपूर्ण तिच बघते. धाकटी सून शाळा सांभाळते. गुणवत्ता वाढविण्याकडे तिचा कल आहे.

मंदा आणि मंदा आमटे यांचा संवाद कसा होता.
आम्हीजेव्हा तिथे गेलो तेव्हा एकही आदिवासी आमच्याकडे फिरकतच नव्हता. भाषेची अडचण होती. मग मी रिकामं बसता स्वत:ला गुंतवून घ्यायचो. त्यामुळेचं आमचं ट्यूनिंग चांगलं जमलं असावं. आम्ही त्यांची भाषा शिकलो. जीवन कंटाळवाणं झालंच नाही.

* शासनाने त्रास देऊ नये हीच त्यांची एक मोठी मदत.
* जीवनदायी योजनेचा लाभ जीवन संपल्यावर येतो. त्यामुळे यात बदल व्हावा असे वाटते.
* तुम्ही पैशांसाठी रुग्णाची वाट बघता, आम्ही विश्वासासाठी.
* नाना म्हणतो लोकं लग्नानंतर जंगलात हनीमूनसाठी जातात, यांचा तर ४२ वर्षांचा हनीमून झाला.

मेडिकल गप्पा
*सर्पदंश कमी झाले - आतात्या लोकांची भटकंतीच कमी झाली त्यामुळे सर्पदंश कमी झाले. पण आमच्याकडे आम्ही त्यावरील उपचारांचा स्टाॅक ठेवतो. शेतात काम करतात तेव्हा दंश होतोच.

*मासिक पाळीत इन्फेक्शन नाही - येथेशिक्षणामुळे थोडा बदल झाला आहे. आपल्याकडे पूर्वी सोवळं म्हणून स्त्री बाजूला बसे, पण या स्त्रिया केवळ कपडे नाही, म्हणून बाजूला बसत. पण निसर्ग ग्रेट आहे कधीच इन्फेक्शन झालेलं नाही.

*आता फॅमिली प्लॅनिंग- पूर्वीया लोकांची मुलं जगतच नव्हती. कारण खायला काहीच मिळत नसे. आम्हीही कुटुंब नियोजनाबद्दल काही बोलत नसू, पण आता आम्ही आग्रह करतो. काही लोक स्वत:हून ऑपरेशनसाठी पुढे येतात.
*लैंगिक शोषण-कुमारी माता - तोसमाज आपल्यापेक्षा सुधारलेला वाटतो. कारण गेल्या ४२ वर्षात तेथे एकही बलात्कार झालेला नाही. लग्नापूर्वी एखादी स्त्री गरोदर राहिली, तर ती सांगते याच्यापासून मी गरोदर आहे. मग एकतर त्यांचं लग्न लावलं जातं वा तिला नुकसान भरपाई देऊन सुटका केली जाते.

*सध्याचे रुग्णालय - २६डिसेंबरलाच नवीन रुग्णालयाचे उद‌्घाटन झाले. शहरातही ज्या सुविधा मिळणार नाही तशा सुविधा येते उपलब्ध आहेत. साडेचार कोटी रुपयांतून मोठ्या कष्टाने आणि अनेकांच्या सहकार्याने हे रुग्णालय सुरू झाले आहे. त्यात लॅब, स्क्रिनिंग, इतर सगळ्या टेस्ट आता येथेच होतात.