आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ‘प्रकाशयात्रा-आठवणींची’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पल्याडत्यांचे नाद सावळे
उरात उरले श्वास लयींचे
रंगसुरांची अक्षय मैफल
मंद तेवती दीप सयींचे...

पानगळ..कधी ऋतुतली तर कधी बेमोसमी.. पानगळीच्या वावटळीशी झगडत काही जुनी, तर काही नवीही पानं पक्षी होऊन भर मैफलीतून उडून गेली.. पण अजूनही या नगरीच्या कलासक्त काळजाच्या कोनाड्यात त्यांच्या स्मृतींचा मंद दिवा तेवतो आहे... अशा कलासक्तांची आठवण वेगळी काढावी लागतच नाही. तरीही या दिवाळीत त्यांच्या स्मृतींचा एक कंदील कुसुमाग्रजांच्या अंगणात लागणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे हा आगळा-वेगळा दीपोत्सव कुसुमाग्रज स्मारकात शुक्रवारी (दि. ६) संध्याकाळी ६.३० वाजता साजरा होणार आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी सायंकाळी साजरा होणारा ‘प्रकाशयात्रा आठवणींची’ हा एक आगळा सोहळा नाशिककरांच्या स्मृतींना उजाळा देणारा ठरणार आहे. कवी कुसुमाग्रजांचे रसिकांच्या हृदयातील अढळ स्थान लक्षात घेऊन तारांगणातील एक तेजस्वी ताऱ्याचे ‘कुसुमाग्रज’ असे नामांकन करण्यात आले. कुसुमाग्रज हे लकाकता तारा आहेतच, पण नाशिकमध्ये अशा अनेक ताऱ्यांनी आपले कार्य करत कलाविश्वात एकप्रकारे अढळ स्थान मिळवलेले आहे. या कार्यक्रमामध्ये स्वा. सावरकर, कवी गाेविंद, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके अशा साहित्य, नाट्य, संगीत आणि विविध कलाप्रांतातील आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिवंगत कलावंतांच्या पाऊलखुणा जपत कुसुमाग्रज स्मारकात एक कंदील लावण्यात येणार आहे. तसेच या कलावंतांच्या कुटुंबीयांसाठी खास फराळाचेही आयोजन करण्यात आले आहे. या आगळ्या वेगळ्या स्वरूपाच्या कार्यक्रमात दिवंगत कलावंतांच्या कुटुंबीयांसमवेत आठवणींची देवाणघेवाण केली जाणार असून, यातून या कलावंतांच्या स्मृतींना यावेळी उजाळा दिला जाणार आहे.

१५० कलावंतांचे स्मरण...
या दीपोत्सवात नाशिकच्या १५० कलावंतांचे स्मरण, त्यांचे कार्य आणि महती याची माहिती दिली जाईल. या कलावंतांच्या कुटुंबीयांसमवेत आठवणींची देवाणघेवाण व्हावी आणि पुन्हा लक्ष-लक्ष चंदेरी क्षणांची उधळण व्हावी हे प्रयोजन आहे. यात स्वा. सावरकर, कवी गोविंद, दादासाहेब फाळके, कविवर्य कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, बाबूराव बागुल, वामनदादा कर्डक, अरुण काळे, मदन गर्गे, शिवाजी तुपे अशा दिग्गजांच्या नावे एक कंदील पणती लावली जाणार आहे. - विनायक रानडे, प्रकाश यात्रा कार्यक्रमाचे संकल्पक
बातम्या आणखी आहेत...