आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकचाही रंगकर्मी चमकावा - प्रशांत दामले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिकचा रंगभूमीवरचा प्रवास योग्य दिशेने होत नसल्याने, व्यावसायिक रंगभूमीवर गेल्या अनेक वर्षांत येथून एकही रंगकर्मी आलेला नाही, असे सांगतानाच प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नाटके किती झाली यापेक्षा एका नाटकाचे किती प्रयोग झाले, हे व्यावसायिकतेच्या दृष्टीने महत्त्वाचे धोरण नाशिकने अंमलात आणावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महाकवी कालिदास कलामंदिर येथे अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेतर्फे वसंत कानेटकर रंगकर्मी व वि. वा. शिरवाडकर नाट्यलेखन, तसेच नटर्शेष्ठ बाबूराव सावंत पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी नुकत्याच झालेल्या 94 व्या अ. भा. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यांच्या हस्ते दामले यांना 25 हजार रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह या स्वरूपाच्या वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना दामले पुढे म्हणाले की, ‘गेल्या 30 वर्षांच्या कारकीर्दीत नाशिकचा हा पहिला पुरस्कार आहे.

कानेटकरांच्या ‘लेकुरे उदंड जाहली’ या नाटकाचे नाशिकमध्ये आम्ही 400 ते 500 प्रयोग केले होते. त्यावेळी कानेटकरांच्या सहजसुंदर लेखनशैलीची प्रचीती आली होती. तो अनुभव माझ्या आयुष्यातील एक आनंदाचा टप्पा होता.’ असे सांगून दामले यांनी पुरस्कार मिळाल्याबद्धल ऋण व्यक्त केले. व्यासपीठावर नाट्यपरिषदेचे मध्यवर्ती कार्यालयाचे अध्यक्ष मोहन जोशी, कार्यवाह दीपक करंजीकर, नाशिक शाखेचे उपाध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, कार्याध्यक्ष सुनील ढगे आदी मान्यवर उपस्थित होते. किशोर पाठक यांनी सूत्रसंचालन केले.

या सोहळ्यात ज्येष्ठ नाटककार प्रा. मधुकर तोरडमल यांना वि. वा. शिरवाडकर नाट्यलेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र दाते आणि डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी काकडे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.

तोरडमल यांनी पत्राद्वारे पाठविलेल्या मनोगतात नाशिकशी आपल्या ब्रिटिशकाळात डीवायएसपी असलेल्या आजोबांपासून प्रेक्षकांच्या आपल्या नाटकांना मिळालेल्या प्रतिसादापर्यंतच्या स्मृती जागविल्या. 25 हजार रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

नेताजी भोईर यांना बाबूराव सावंत पुरस्कार
नाट्यपरिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष व ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर यांना यंदापासून सुरू करण्यात आलेला ‘नटर्शेष्ठ बाबूराव सावंत पुरस्कार’ काकडे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. पाच हजार रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. नाशिक केंद्रावर 1970 मध्ये राज्य नाट्यस्पर्धेत माझे नाटक पहिले आले असताना मला खांद्यावर बसवून जल्लोष करणारे बाबूराव सावंत होते, ही हृद्य आठवण जागी करत नेताजी यांनी आजही बाबूराव सावंत आठवणींच्या रूपाने सतत पाठीशी आहेत, असे सांगत आभार मानले. बागेर्शी वाद्यवृंदातर्फे सोनल अधिकारी, रार्जशी शिंपी, शताक्षी लोणकर, मृणालिनी नरसे, रूपाली कुलकर्णी यांनी या वेळी ‘हे नटराज देवाधिराज’ ही कुसुमाग्रजांच्या राजमुकुट या नाटकातील नांदी प्रारंभी सादर केली. त्यांना मंदार दीक्षित, राहुल अढांगळे, दीपक दीक्षित यांनी साथसंगत केली.

दामले यांना पद्मर्शी मिळेस्तोवर मागे हटणार नाही
नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी प्रशांत दामले यांना पद्मर्शी पुरस्कार मिळावा यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न करत असल्याचे सांगत दामलेंना तो मिळेस्तोवर मागे हटणार नाही, असे मनोगतात जाहीर केले.

आजही प्रयोग संपल्यानंतर उभे राहून जेवावे लागते
मनोगत व्यक्त करताना प्रशांत दामले यांनी 30 मार्च 1987 साली स्थापन झालेल्या कालिदास कलामंदिरास आज 27 वर्षे झाली, तरी प्रयोग संपल्यानंतर उभे राहून जेवावे लागते. उद्या महानगरपालिकेने जेवायला बोलावले तरी मी उभे राहूनच जेवणार आहे, असे सांगत आम्हा कलाकारांची ही स्थिती, तर प्रेक्षकांची प्रेक्षागृहात काय स्थिती होत असेल, असा सवाल करत नाट्यगृहाच्या दुरवस्थेवर ताशेरे ओढले. मात्र, हे ताशेरे ओढत असतानाच दामले यांनी नाट्यपरिषदेच्या शिल्लक राहिलेल्या कामांसाठी आपला पुरस्काराचा 25 हजार रुपयांचा चेक अध्यक्षांकडे परत केला. शिवाय नाशिकच्या कलाकारांसाठी अभिनय प्रशिक्षण शिबिर घेण्यासाठी तीन महिने सुटी काढून नाशकात येईन, असे आश्वासनही दिले.

‘नकळत दिसले सारे’ नाटकाचा रंगला प्रयोग
पुरस्कार सोहळ्यानंतर प्रशांत दामले आणि रश्मी देव यांच्या मध्यवर्ती भूमिका असलेले ‘नकळत दिसले सारे’ हे खुमासदार नाटक रंगले. दोघांच्या उत्स्फूर्त संवादफेकीमुळे नाटकाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.