आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवरा ट्रस्ट ठरतोय समलैंगिकांचा आधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - समलैंगिकांसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘शासन मानत नाही अन् समाज स्वीकारत नाही’ अशी भावना समलैंगिक समूहात व्यक्त होत आहे. मानसिक खच्चीकरण होऊ लागल्यामुळे त्यांना मानसिक पाठबळ देण्याचे काम प्रवरा मेडिकल ट्रस्टतर्फे केले जात आहे. त्यांचा स्वीकार करण्याची समाजाची मानसिकता नसल्याने यासंदर्भात जनजागृतीची गरज ‘प्रवरा’च्या पाठबळाद्वारे प्रतिपादित होत आहे.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण विभागाच्या अर्थसहाय्याने प्रवरा मेडिकल ट्रस्टने 2005 पासून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ‘एचआयव्ही’च्या जनजागृतीवर काम सुरू केले असून, एड्सला प्रतिबंध करण्यासाठी ट्रस्टतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत.

या उपक्रमांचाच एक भाग म्हणून गेल्या आठ वर्षांत समलैंगिकांची नोंदणी ट्रस्टने केली आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात नोंदणी केलेल्यांची संख्या सुमारे 1270 असून, त्यांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जात आहेत. शासकीय सुविधा मिळविण्यात समलैंगिक संबंध असणार्‍यांना येणार्‍या अडचणी ट्रस्टच्या माध्यमातून सोडविल्या जातात.

रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी सुविधा मिळवून देण्यासाठी ट्रस्टकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती प्रकल्प समन्वयक कुलदीप पवार यांनी दिली.

समानतेत आम्ही का नाही?
पुरातन काळापासून समलैंगिक संबंध ठेवले जात असताना कायद्याने आम्हाला अधिकार मिळण्याची गरज होती. परंतु, कायद्यानेच गुन्हेगार ठरविल्याने आमचा जगण्याचा मूलभूत अधिकार हिरावून घेतला आहे. जर स्त्री-पुरुष समान आहेत, तर मग आम्ही का नाही? सदस्य, मनमीलन संस्था

जनजागृतीची गरज
समलैंगिक संबंध ठेवणारा समुदाय हा केवळ शहरी व मेट्रो सिटीतच नाही, तर ग्रामीण भागातही आहे. मात्र, त्यांचे आरोग्य व सामाजिक समस्या याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यांचा स्वीकार करण्याची समाजाची मानसिकता नसल्याने जनजागृतीची गरज आहे. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर ट्रस्टकडून पाठिंबा दिला जाईल. आसावरी देशपांडे, प्रकल्प संचालिका, प्रवरा मेडिकल ट्रस्ट