आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशकात प्रीपेड रिक्षा प्रवासाचे ‘स्वातंत्र्य’; 15 ऑगस्टनंतर अंमलबजावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बारा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रीपेड ऑटोरिक्षा योजनेस हिरवा कंदील मिळाला असून 15 ऑगस्टनंतर प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार आहे. दोनशे रिक्षाचालकांनी योजनेत सहभागी होण्यास संमती दिली असून त्या सर्वांची माहिती कंत्राटदार संस्थेकडे राहणार असल्यामुळे नाशिकरोडपासून होणारा ऑटोरिक्षा प्रवास सुरक्षित होणार आहे.

ऑटोरिक्षासह सर्वच प्रवासी वाहतुकीसंदर्भात आरटीओ-पोलिस अधिकारी व जिल्हाधिकारी यांची बैठक नुकतीच झाली होती. त्यातील निर्णयाची माहिती मंगळवारी जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली. त्यानुसार, प्रीपेड रिक्षा प्राथमिक स्तरावर नाशिकरोड रेल्वेस्टेशनपासून शहरातील 27 ठिकाणांसाठी दरही जाहीर केले. मीटरदराच्या तुलनेत 20 टक्के अधिक दर आकारला जाणार असला तरी यामुळे रात्री-अपरात्रीचा प्रवास सुरक्षित होणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. प्रायोगिक स्तरावर कंत्राट दिलेल्या भारतरत्न मागासवर्गीय सहकारी ग्राहक संस्थेस देण्यात येणारे 2 रुपये सेवाशुल्क त्याव्यतिरिक्त राहील.

संस्थेस मनुष्यबळ व बूथवरील यंत्रणा उभारणीसाठी 15 ऑगस्टची मुदत दिल्याचे पाटील यांनी सांगितले. बूथ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवला जाणार आहे. पुढील काळात चालकाचा फोटोही भाडेपावतीवर देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड, उपायुक्त नंदकुमार चौघुले, उपप्रादेशिक अधिकारी जयंत पाटील आदी उपस्थित होते.

शेअर-ए-रिक्षाही होणार शहरात सुरू
प्रीपेडसोबतच शेअर-ए- रिक्षाही सुरू करण्यात येणार असून मीटरप्रमाणे दर आकारला जाईल. नाशिकसह मालेगाव शहरातील सात व मनमाडमधील दोन मार्गांवर या योजनेस मान्यता दिली आहे. मीटर टॅक्सी सेवेसाठी पहिल्या किलोमीटरकरिता 20, तर त्यानंतर प्रतिकिलोमीटर 16 रुपये आकारले जाणार आहेत.

अशी असेल योजना
नाशिकरोड रेल्वे स्थानकावर संबधित संस्थेचा बूथ राहील. योजनेत सहभागी झालेल्या रिक्षांची व चालकांची इत्थंभूत माहिती त्यात असेल. त्यांना दिलेल्या थांब्यापासून 300 मीटरच्या परिसरात इतर रिक्षाचालकांना येण्यास परवानगी राहणार नाही. प्रवाशाला दिल्या जाणार्‍या भाडेपावतीवर रिक्षाक्रमांक, चालकाचे नाव व तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक राहील. प्रवासी उतरेल तेथे पावतीनुसार शुल्क चालकास देण्याची व्यवस्था आहे. दिवसा मीटरदराच्या 20 टक्के अधिक तर रात्री 25 टक्के अधिक दर आकारला जाईल.

परवानारहित वाहने स्क्रॅप करणार
एकाच परवान्यावर बेकायदेशीररीत्या चालणार्‍या वाहनांमुळे गुन्हेगारीस चालना मिळत असल्याने परवाना उतरवलेली किंवा नोंदणी रद्द केलेली वाहने स्क्रॅप करण्याची तंबी जिल्हाधिकारी पाटील यांनी दिली. परवान्यांची नूतनीकरणाची मुदत 31 सप्टेंबर 2013 पर्यंत दिल्याचे त्यांनी सांगितले. परवान्यांसाठी विलंब झाल्यास रिक्षा-टॅक्सीला 50, तर बस-ट्रकसाठी 100 रुपये प्रतिदिन दंड किंवा एक दिवसाचा परवाना निलंबित केला जाईल. रिक्षा-टॅक्सी नूतनीकरणासाठी 30 सप्टेंबर 2013 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणार्‍या वाहनांवरही कडक कारवाईचे आदेश त्यांनी दिले. खासगी बसमधून मालवाहतूक केल्यास 15 दिवसांचा परवाना निलंबित किंवा 5 हजार रुपयांपर्यत तडजोड शुल्क भरावे लागेल, असे ते म्हणाले. शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या बसमधून क्षमता व नियमानुसार कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे पाटील म्हणाले.