आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धीसाठी सुपीक जमिनी नको : शेट्टी, ड्रोनद्वारे केलेल्या मोजणीचा हा आकडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक  - नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्यास विरोध असणारे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आज (मंगळवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश यात्रेत सामील होत आहेत. नापीक पर्यायी जागा उपलब्ध असताना, या महामार्गासाठी आमच्या सुपीक जमिनी संपादित करण्यात येऊ नयेत, ही मागणी ते राज्यपालांपुढे मांडणार आहेत. दरम्यान, नाशिक जिल्हा प्रशासनाने थेट खरेदीची प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठीचे दर येत्या आठ दिवसांत निश्चित होण्याची शक्यता आहे.   
 
नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचा १०१ किलोमीटर मार्ग नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यांमधून जात आहे. त्यासाठी इगतपुरी तालुक्यातील २३ गावांतील ४० किमी, तर सिन्नर तालुक्यातील २६ गावांमधील ६१ किमी क्षेत्र संपादित करावे लागणार आहे. या ४९ गावांमधील १२०० शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया शासनाने सुरू केली आहे. त्यासाठी ८८ किमी क्षेत्राची शेतकरी आणि शासन अशी संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. मात्र, शिवडे, घोरवड या गावांमधील १३ किमीची संयुक्त मोजणी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे बाकी आहे. शासनाने मांडलेल्या लँड पुलिंगचा पर्याय प्रत्यक्षात न उतरल्याने आता थेट खरेदीद्वारे जमीन संपादित करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासन सुरू करणार आहे. त्याची जाहीर नोटीस प्रकाशित झाली आहे. जमीन देण्यास विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हरकती दोन्ही प्रांताधिकाऱ्यांकडे नोंदवल्या आहेत.    
 
दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत दाखल झालेल्या आत्मक्लेश यात्रेत समृद्धी महामार्गासाठी जमीन देण्यास विरोध असलेले शेतकरी  सहभागी होत आहेत. नापिकी जमिनीचा पर्यायी मार्ग उपलब्ध असताना, आपली बागायती सुपीक जमीन संपादित केली जाऊ नये,  अशी मागणी ते राज्यपालांकडे करणार आहेत.   
 
१४ शेतकऱ्यांचा आकडा आला कुठून?  : शेतकऱ्यांनी मोजणीस विरोध करू नये, मोजणी झाली नाही तर कोण शेतकरी बाधित आहेत हे समजणार कसे, जेथे १४ शेतकऱ्यांची ३८ हेक्टर जागा बाधित आहे त्याच ठिकाणी नेतेमंडळी जात आहेत, असे विधान रविवारी नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नाशिक जिल्ह्यातील समृद्धीच्या १०० किमी मार्गावर ४९ गावांतील १२०० खातेदार आहेत. त्यावरील ८ हजार शेतकऱ्यांपैकी नेमकी कोणाची आणि किती जमीन जाते हे मोजणीनंतरच स्पष्ट होऊ शकते. परंतु त्याआधीच नाशिकमध्ये त्याबाबत वाद निर्माण झाला आहे.   
 
जिल्हाधिकारी दिशाभूल करत आहेत 
- संयुक्त मोजणी झालीच नसताना १४ शेतकऱ्यांचा आकडा मुख्यमंत्र्यांना देऊन जिल्हाधिकारी दिशाभूल करत आहेत. आम्हाला जमीन द्यायचीच नाही, त्यामुळे संयुक्त मोजणीचा प्रश्नच उद्भवत नाही. सरकारने एक समिती नेमून नुकसानीचा अंदाज घ्यावा, ही आमची मागणी आहे. 
-रावसाहेब हारक, सदस्य शेतकरी संघर्ष समिती, शिवडे   
 
ड्रोनद्वारे केलेल्या मोजणीचा हा आकडा     
- यात तथ्य नाही, ड्रोनद्वारे केलेल्या मोजणीतून हे आकडे पुढे आले आहेत. शेतकऱ्यांनी कुणाच्या चिथावणीस बळी पडू नये. त्यांना अधिकाधिक नुकसान भरपाई देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. 
-राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी, नाशिक
 
बातम्या आणखी आहेत...