आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Printing Seal For Voter Electronic Machine Very Secure In Nashik

मतदानयंत्र सीलची छपाई सिक्युरिटी प्रेसमध्ये सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू केली असून, मतदान यंत्रासाठी आवश्यक सीलची नाशिकरोडच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये छपाई सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील 80 लाख सीलपैकी 55 लाख सीलची छपाई पूर्ण झाली आहे.
लोकसभेची मुदत एप्रिल महिन्यात संपत असून, आयोगाने मे महिन्यात सार्वत्रिक निवडणुकीचे संकेत दिले आहे. मतदानयंत्रावर लावण्यात येणारी पट्टी स्टिकर स्वरूपात छापण्यात येत आहे. तिचा वापर मतदानानंतर सील म्हणून केला जातो. आयोगाने सध्या 80 लाखांची मागणी केली असली तरी, जवळपास एक कोटीपर्यंत होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील मागणी वेळेत पूर्ण करण्यासाठी दररोज 75 ते 80 हजार सीलची छपाई केली जात असून, मार्चपर्यंत छपाई पूर्ण होणार आहे. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत लोकसभा, विधानसभा निवडणुकीसंबंधीचे कोणतेही काम प्रेसला मिळाले नव्हते. प्रथमच मिळालेले काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करून देण्यासाठी कर्मचार्‍यांसह अधिकारी मेहनत घेत आहेत.
अमरनाथ यात्रेच्या पासची छपाई
कमी खर्चात, दर्जेदार काम मागणीनुसार वेळेत मिळत असल्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील छपाई कामासाठी इंडिया सिक्युरिटी प्रेसला संस्थांकडून प्राधान्य दिले जात आहे. म्हणूनच लोकसभा निवडणुकीच्या छपाईसह अमरनाथ यात्रेच्या यात्रेकरूंना शासनातर्फे देण्यात येणार्‍या पासच्या छपाईची जबाबदारी प्रथमच इंडिया सिक्युरिटी प्रेसवर सोपवण्यात आली असून, सुमारे 14 लाख पास छपाईची मागणी नोंदवण्यात आली आहे. अमरनाथ यात्रा जूनच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात सुरू होते. मात्र, यात्रेकरूंकडून एप्रिल, मेमध्येच नोंदणी सुरू होत असल्याने ह्या तातडीच्या छपाईसाठी प्रेस कामगार सज्ज झाले असून, मार्चपर्यंत छपाई पूर्ण करून देण्याचे नियोजन केले आहे.
जबाबदारी पार पाडल्याचा इतिहास
देशाला तातडीने महत्त्वपूर्ण दस्तऐवज छपाईची गरज भासली तेव्हा इंडिया सिक्युरिटी, करन्सी नोट प्रेस कामगारांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जबाबदारी पार पाडल्याचा इतिहास आहे. एशियाड गेम्स, महापुरुष, राष्ट्रीय नेते यांचे जन्मदिन, विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने सरकारतर्फे विशेष सोहळ्यानिमित्त टपाल, संग्रहित तिकीट, तसेच नेपाळच्या प्लास्टिक नोटा, सचिन तेंडुलकरच्या वेगवेगळ्या छबीतील तीन प्रकारच्या तिकिटांची छपाई करून प्रेसने राष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व सिद्ध केले आहे. यापुढे प्रत्येक जबाबदारी वेळेत पूर्ण करण्याची प्रेसची क्षमता आहे. - ज्ञानेश्वर जुंद्रे, इपीएफ ट्रस्टी