आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Private Buses Traveling Issue At Nashik, Divya Marathi

सुटी, लग्नसराईमुळे खासगी बसच्या भाड्यात दीडपट वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- उन्हाळी सुटी आणि लग्नसराईमुळे सध्या परगावी जाणा-या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. परिणामी एसटी महामंडळाच्या बससाठी आठ ते दहा दिवस अगोदर आरक्षण करूनही जागा मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अनेक जण एसटीऐवजी खासगी बस व इतर वाहनांना प्राधान्य देत आहेत. खासगी टॅव्हल्समध्येदेखील दोन-तीन दिवस अगोदर आरक्षण करूनही तिकिटे मिळत नसून, खासगी बसच्या भाड्यात दीडपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
शहरातून दररोज रात्री मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सुरत आदी शहरांत खासगी बस जातात. शहरातील मुंबई नाका परिसर, द्वारका व त्र्यंबक नाका परिसरात या बस उभ्या असतात. महामंडळाचे आरक्षण मिळत नसल्याने खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला सध्या प्रवाशांकडून अधिक पसंती दिली जात आहे. दररोज रात्री शहरातून किमान 75 ते 100 बस विविध शहरांत जातात. एरवी प्रवासी शोधणा-या खासगी ट्रॅव्हल्सकडून विविध सवलती दिल्या जातात. सध्या मात्र वाढत्या गर्दीमुळे या बसच्या भाड्यात दीडपट वाढ झाली आहे.

पूर्वी केवळ बसून प्रवासाची सोय असणा-या या गाड्यांमध्ये आता रेल्वेप्रमाणे झोपूनही प्रवासाची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी अतिरिक्त भाडे आकारले जाते. प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे वेळेवर तिकिटे उपलब्ध होत नसून, दोन-तीन दिवस अगोदर नोंदणी करावी लागत आहे. मात्र, एसटीपेक्षा आरामदायी प्रवास होत असल्याने प्रवाशांकडून लांबच्या अंतरासाठी या बसने प्रवास करण्यास पसंती दिली जात आहे.
सेवा आणि गाड्यांची सजावट : महामंडळाच्या बसच्या तुलनेत खासगी बस व्यावसायिकांकडून बसमध्ये एसी, आकर्षक पडदे, प्रवाशांचे साहित्य ठेवण्यासाठी गाडीच्या मागच्या बाजूस डिक्की उपलब्ध करून देण्यात येते. याशिवाय या गाड्यांना बाहेरच्या बाजूनेही आकर्षक सजावट करण्यात येते. त्यामुळे प्रवासी आकर्षित होऊन या बसने प्रवासाला प्राधान्य देतात.
..या प्रमाणे होतेय भाडे आकारणी
मार्च-एप्रिल हा काळ परीक्षांचा असल्याने त्या वेळी प्रवासी संख्या कमी होती. त्यामुळे मुंबई, पुणे व इतरत्र जाण्यासाठी साधारणत: अडीचशे ते तीनशे रुपये भाडे आकारण्यात येत होते. मात्र, आता प्रवासी वाढल्याने काही दिवसांपासून भाड्यात वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत मुंबई, पुण्यासाठी बसून प्रवास करण्यासाठी 500 ते 550 रुपये आणि झोपून प्रवास करण्यासाठी त्यापेक्षाही जास्त भाडे आकारले जात आहे.