आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘थर्ड क्लास’ शिकवणी; शिक्षिकेने चिमुकलीचे केस ओढत हाता-पायांवर मारले काठीने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कामटवाडेतील एका खासगी क्लासचालक शिक्षिकेने आठ वर्षांच्या चिमुकलीस काठीने हाता-पायांवर वळ उठेपर्यंत व डोक्याचे केस ओढून अमानुष मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला. या घटनेनंतर चिडलेल्या पालकांनी शिक्षिकेविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मुलीचे पालक मिलिंद शेंडे (रा. अंबा अपार्टमेंट) यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी रिया रचना विद्यालयातील विद्यार्थिनी असून घरापासून जवळच असलेल्या अमिराज अपार्टमेंटमधील शिला शिवदास (गंगा मॅडम) यांच्या खासगी क्लासला जाते. मंगळवारी क्लास सुरू असताना तिने शिक्षिकेकडे नैसर्गिक विधीस जाण्याची परवानगी मागितली. शिक्षिकेने नकार देत 40 विद्यार्थ्यांसमोर अपमानित केले. त्यानंतर अर्धा तास रियाला क्लासमध्येच बसून राहणे भाग पडले व असह्य वेदना होऊन अखेरीस तिला क्लासरूममध्येच नैसर्गिक विधी झाला. हे लक्षात आल्यावर रियाला धीर देण्याऐवजी शिक्षिकेने तिलाच कपड्याने जागेची स्वच्छता करायला लावली. एवढय़ावरच न थांबता रियाला काठीने हाता-पायांवर वळ उठेपर्यंत मारले. बेभान झालेल्या शिक्षिकेला रडणार्‍या रियाची दया आली नाही व तिच्या डोक्याचे केस ओढण्यापर्यंत शिक्षिकेची मजल गेली. या मारहाणीमुळे रियाची तब्येत खालावली व तिने घरी येऊन आई-वडिलांना हा प्रकार सांगताच त्यांना धक्का बसला. त्यांनी तातडीने रियाला रुग्णालयात नेले.
पालकांनी नगरसेवक अनिल मटाले यांच्या कानावर हा प्रकार घालून अंबड पोलिस ठाण्यात तक्रार केली.

रिया भीतीच्या छायेखाली..
आमच्या मुलीला एवढय़ा अमानुष पद्धतीने मारण्याचा अधिकार त्या शिक्षिकेला कोणी दिला? अपमान व मारहाणीमुळे रिया भीतीच्या छायेखाली असून, तिच्या हाता-पायांवर गंभीर जखमा झाल्या आहे. शिक्षिकेविरुद्ध कठोर कारवाई करावी.
- मिलिंद व पल्लवी शेंडे, आई-वडील

संतापजनक घटना
तिसरीतल्या विद्यार्थिनीला नैसर्गिक विधीस जाऊ न देता इतकी कठोर शिक्षा देणे संतापजनक आहे. क्लासचालकांनी विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण तयार केले पाहिजे.
-अनिल मटाले, नगरसेवक

नैराश्याची भीती
शिक्षिकेच्या कठोरतेमुळे यापुढे मानसिक ताण निर्माण होईल. या घटनेची कटू आठवण तिच्या मनातून लवकर जाणार नाही. बालवयात अशा घटना घडल्यास मानसिक समस्या जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढे जाऊन वर्तणूक समस्या निर्माण होऊ शकते. तिच्यात नैराश्य येऊ नये म्हणून आम्ही तिचे समुपदेशन करू.
-सचिन जोशी, बालसमुपदेशक

आरोग्यासाठी घातकच
पावसाळ्यात लघुशंकेचे प्रमाण वाढते. नैसर्गिक विधी रोखून धरल्यास जंतुसंसर्ग होऊ शकतो. खडे तयार होऊ शकतात. स्वच्छ जागेत नैसर्गिक विधी होणे गरजेचे आहे. अशा घटनांमुळे मुलांमध्ये भीती तयार होऊन ते पाणी व आहार कमी करतात. याचा परिणाम शारीरिक व मानसिकदृष्ट्या होऊ शकतो. - -डॉ. श्यामा कुलकर्णी, बालरोगतज्ज्ञ