आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Problem In Online Form Of Forest Department Exam From Mkcl

एमकेसीएलचा घोळ, उमेदवारांना मनस्ताप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वनविभागातील रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्याचे कंत्राट एमकेसीएल (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि.) या कंपनीस दिले आहे. मात्र, हे अर्जच कंपनीच्या संकेतस्थळावर अपलोड होत नसल्याने उमेदवारांना मनस्ताप होत आहे. अशातच काही विभागांची अर्ज सादरीकरणाची मुदतही संपल्याने एमकेसीएलच्या या घोळात बेरोजगारांना नोकरीची संधीच गमवावी लागली आहे. कित्येक नाराज उमेदवारांनी कंपनीचा ठेकाच बदलण्याची मागणी केली आहे.

एमकेसीएलद्वारे उमेदवारांकडून ऑनलाइन अर्जापासून ते परीक्षा घेणे आणि त्यांचे निकाल लावण्यापर्यंत सर्वच कामकाज केले जाते. मात्र या एकूण प्रक्रियेत कंपनीचा गेल्या वर्षभरापासून घोळ सुरूच असून, आताही काही खात्यांतील भरतीसाठी मागवलेले अर्ज पूर्णपणे भरले जात नाहीत. वनविभागातर्फे वनरक्षकपदासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्याची मुदत 22 जुलै 2013 होती. अनेक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरून चलनची पिंट्रही काढली. मात्र, बँकेत चलन भरण्यासाठी गेले असता अर्जच अपलोड नसल्याने बँकेने चलन स्वीकारण्यास असर्मथता दर्शविली. काही उमेदवारांचे चलन बँकेत स्वीकारल्यानंतर अर्ज पुन्हा भरण्यासाठी गेले असता तो स्वीकारलाच जात नाही.

नाशिकमध्ये जवळपास शंभर-सव्वाशे विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नसल्याची माहिती ‘दिव्य मराठी’ला मिळाली. मात्र, ही संख्या अधिकही असण्याची शक्यता असल्याने कंपनीचे कंत्राट रद्द करत अर्ज भरण्याची मुदत वाढवण्याची मागणी उमेदवारांकडून होत आहे. जलसंपदा विभागाकडूनही गेल्या वर्षी लिपिक पदासाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्याही वेळी असाच घोळ झाल्याने बहुतांश विद्यार्थ्यांची तेव्हाही संधी हुकली होती. मात्र, स्थितीत सुधारणा झाली नाही.

संधी गेली, पैसेही गेले : एमकेसीएलच्या अशा तांत्रिक घोळामुळे राज्यभरातील कित्येक उमेदवारांवर हातातोंडाशी आलेल्या नोकरीची संधी गमविण्याची वेळ आली, शिवाय त्यांचे पैसेही वाया गेले. त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवालही या उमेदवारांनी उपस्थित केला.

जिल्हा स्तरावरून काही करता येत नाही
ही प्रणाली पुण्यातील आमच्या मुख्य केंद्रातूनच सुरू आहे. आम्हाला किंवा जिल्हा स्तरावरून त्यात काहीच करता येत नाही. ज्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी ऑनलाइन अर्ज सादर केले असतील. तसेच त्याच दिवशी चलन काढण्याचा प्रयत्न केला असेल, तर काही अडचण येऊ शकते. अन्यथा नाही. सुभाष पाटील, जिल्हा समन्वयक, एमकेसीएल


संधी हुकल्याने वाईट वाटते
अर्ज भरण्याची मुदत 22 जुलै होती. त्यामुळे मी 20 जुलैलाच अर्ज भरला. चलनची प्रिंटही काढली. परंतु बँकेत गेलो असता त्यांनी माझा अर्जच अपलोड झाला नसल्याने चलन स्वीकारता येणार नसल्याचे सांगितले. दरम्यान, ठाणे विभागात 76 जागा असल्याने तेथील जागांसाठी मी अर्ज केला होता. नाशिकमध्येही काहीशी अशीच स्थिती आहे. चांगली तयारी झाली होती. परंतु अर्जच भरता न आल्याने संधी गेली. खूप वाईट वाटते. कौस्तुभ बाबरेकर, उमेदवार

ना हॉलतिकीट, ना पत्र
मी मागील वर्षी जलसंपदा विभागातील लिपिक पदासाठी अर्ज केला होता. 400 रुपयांचे चलनही भरले होते. मात्र, चलनचा नंबर अर्जात स्वीकारलाच गेला नाही. ना हॉल तिकीट आले ना कुठले पत्र. त्यामुळे मला परीक्षाच देता आली नाही. शिवाय चारशे रुपयेही गेले. माझ्या बहिणीच्या बाबतीतही असेच घडले. आरती गोळे, उमेदवार

अर्ज अपलोड होत नाही
माझा सायबर कॅफे आहे. माझ्याकडे अनेक विद्यार्थी, उमेदवार अर्ज भरण्यासाठी येतात. मात्र एमकेसीएलचे अर्ज अपलोडच होत नाही. अशी स्थिती मागील वर्षी जलसंपदा विभागाच्या लिपिक पदाच्या बाबतीत झाली होती. राजेंद्र चव्हाण, सायबर कॅफे मालक

अन्यथा मनविसे करणार आंदोलन
एमकेसीएलने आपला कारभार सुधारावा. उमेदवारांना त्रास होऊ नये, अशी अनुकूल स्थिती तयार करावी. अन्यथा मनविसे आपल्या पद्धतीने आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरेल. अजिंक्य गिते, शहर उपाध्यक्ष, मनविसे