नाशिक- स्पर्धेच्या युगात आपले भविष्य उज्जवल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊन कौशल्य हस्तगत केले पाहिजे. ज्ञान आणि कौशल्य मिळविण्याचे महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे तंत्रशिक्षण होय. आधुनिक तंत्रज्ञानाचे आव्हानात्मक शिक्षण घेताना विद्यार्थ्यांमध्ये पॅशन असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भुजबळ नॉलेज सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. वाणी यांनी येथे केले.
एमईटी संचलित आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी या शैक्षणिक संस्थेच्या वतीने येथील महाकवी कालिदास कलामंदिरात ‘लक्ष्य 2014’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दहावी, बारावी व पदवी शिक्षणानंतर पुढे काय? या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. वाणी बोलत होते. या प्रसंगी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विजय भट, संगणक विभागाचे प्रमुख डॉ. एम. यू. खरात, व्यवस्थापन विभागाच्या डॉ. सोनाली गाडेकर, फार्मसीचे प्रा. दिनेश ऋषीपाठक, माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. अरुणा देवगिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. वाणी पुढे म्हणाले की, तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करताना आवड आणि भविष्यातील विविध संधींचा अभ्यास केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीनंतर करिअर निवडताना तज्ज्ञ व जाणकारांचे मार्गदर्शन घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:ची आवड, कल, स्वभाव या गोष्टी लक्षात घेऊन आणि भविष्यातील संधी पाहून करिअर निवडल्यास आयुष्यात त्यांना नक्कीच उज्जवल यश मिळू शकेल. तंत्रशिक्षणासाठी भुजबळ नॉलेज सिटी एक चांगला पर्याय असून, या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डॉ. खरात यांनी विद्यार्थी व पालकांना तंत्रनिकेतन प्रवेशप्रक्रियेची माहिती समजावून सांगितली.