आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राध्यापकांचे आंदोलन तूर्त मागे; शिक्षणमंत्र्यांशी चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पुणे विद्यापीठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने १५ डिसेंबरपासून प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली होती. मात्र, आंदोलनाच्या पूर्वसंध्येला रविवारी (दि. १४) उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे हे आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती पुक्टोचे जिल्हाध्यक्ष आर. के. पाटील यांनी दिली.
२०१३ मध्ये झालेल्या आंदोलनातील ७१ दिवसांचा पगार प्राध्यापकांना देण्यात यावा, २००६ नंतर रुजू झालेल्या प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगातील पगाराचा फरक मिळावा १९९१ ते २००० दरम्यान विधिवत सेवेत आलेल्या प्राध्यापकांना नेट-सेटमधून सूट मिळावी, या तीन प्रमुख मागण्यांसाठी हा संप हाेणार हाेता. उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ‘एमफुक्टो’च्या सेक्रेटरी डॉ. तप्ती मुखोपाध्याय यांच्यातील चर्चेनंतर तावडे यांनी मागण्यांचा विचार करण्यासाठी वेळ द्यावा, असे सांगितले. यानंतर शासनाने आंदोलन काळातील ७१ दिवसांचा पगार देण्याची प्रक्रियाही सुरू केल्याची माहिती मिळाली. या दोन प्रमुख कारणांसाठी हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे.
या आंदोलनात सुमारे दीड हजार प्राध्यापक संपावर जाणार होते. राज्यात सध्या ओला दुष्काळाची स्थिती असून, शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने अशा स्थितीत आंदोलन करणे योग्य नाही, अशी भूमिका संघटनेने मांडली. याचबरोबर उच्च शिक्षणमंत्र्यांनी विभागाचा कारभार स्वीकारल्यापासून विद्यापीठीय महाविद्यालयीन शिक्षकांशी वैरभाव प्रदर्शित करणारे निर्णय झालेले नाही. निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा, या शिक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा आदर करत आंदोलन मागे घेतले जात आहे, अशी माहिती ‘पुक्टो’चे जिल्हाध्यक्ष आर. के. पाटील यांनी दिली.
आंदोलनासाठी ही योग्य वेळ नाही
प्राध्यापकांच्या बेमुदत आंदोलनासाठी महाराष्ट्रात आता असलेली परिस्थिती योग्य नाही. कुठे शेतकऱ्यांचे होणारे अमाप नुकसान, तर कुठे अोला दुष्काळ अशा परिस्थितीत आंदोलन योग्य नाही. याचबरोबर आम्हाला मिळालेल्या समाधानकारक आश्वासनामुळे सरकार लवकरच प्रलंबित मागण्यांचा विचार करेल, असे चित्र तूर्तास दिसते. त्यांनी आंदोलन काळातील ७१ दिवसांचा पगार अदा करण्यास सुरुवात केली हेही एक कारण असून, आंदोलन मागे घेण्यात आले आहे.