आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘समृद्धी’ फक्त मुख्यमंत्र्यांचीच, ‘एक्स्प्रेस वे’च्या समर्थनासाठी भाजपचे बडे नेते रिंगणात नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नागपूर-मुंबईसमृद्धी सुपर एक्स्प्रेस महामार्गासाठी जमिनी देण्यावरून चांगलेच राजकारण तापले असताना, किंबहुना राज्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही उघड विराेधी भूमिका घेतल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासकीय यंत्रणेचे मुखंड वगळता सत्ताधारी भाजपचा एकही बडा पदाधिकारी याेजनेच्या समर्थनासाठी उतलेला नाही. त्यामुळे ‘समृद्धी महामार्ग’ हा फक्त मुख्यमंत्र्यांचाच का? असे म्हटले जात असून, सत्ताधाऱ्यांना फारसा रस नसल्यामुळे या मुद्यावरून विराेधकांना वाद पेटवण्यासाठी अायतेच निमित्त मिळत असल्याची खंत भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेते व्यक्त करीत अाहेत.

‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेत अालेल्या भाजपच्या खात्यात दाेन वर्षांच्या कार्यकाळात प्रशंसा हाेईल असे एकही माेठे काम नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नागपूर-मुंबई ‘समृद्धी’ महामार्गासाठी कंबर कसली असून, संपूर्ण याेजनेच्या यशस्वितेसाठी त्यांनी स्वत: लक्ष घातले अाहे. भूसंपादनापासून माेठे अडथळे दूर करण्यासाठी मुख्यमंत्री स्वत: प्रयत्न करीत असताना, त्यांना स्थानिक पातळीवरून याेग्य साथ मिळण्याची अपेक्षा व्यक्त हाेत अाहे. प्रत्यक्षात सरकारी यंत्रणेचे अधिकारी वगळता पक्षाकडून काेणतीही साथ मिळत नसल्यामुळे मुख्यमंत्री संबंधित याेजनेची अंमलबजावणी करताना एकाकी पडल्याचे दिसत अाहे. या महामार्गाचा एक माेठा टप्पा नाशिकमधून जात अाहे. जवळपास ९७ किमीचा मार्ग नाशिकमधील इगतपुरी सिन्नर या तालुक्यातून जात अाहे. या रस्त्यासाठी अडीच ते तीन हजार हेक्टर जमीन लागणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांना पटविणे अत्यंत महत्त्वाचे अाहे. प्रत्यक्षात यापूर्वीचा अनुभव किंबहुना सेझमध्ये बसलेला फटका लक्षात घेता शेतकरी याेजनेसाठी जागा देण्यासाठी नाखूष अाहेत. अागामी जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेता नाराज शेतकऱ्यांना फुंकर घालण्यासाठी विराेधी पक्ष तुटून पडले अाहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा विराेध स्वाभाविक असताना शिवसेनेनेही विराेधाचे ढाेल वाजवत मित्रपक्ष भाजपला अाव्हान दिले अाहे. या पार्श्वभूमीवर विराेध खाेडून काढणे तर साेडा, मात्र शेतकऱ्यांना याेजना पटवून देण्यासाठी भाजपचे बडे नेते रिंगणात नसल्याचे चित्र अाहे. किंबहुना उगाच याेजनेचे समर्थन करण्याच्या नादात अापली प्रतिष्ठा खराब हाेणार नाही, यासाठी ते चार हात लांबच राहत असल्याचे दिसत अाहे.

पालकमंत्री, अामदारही दूरच
मुख्यमंत्र्यांच्याया ड्रीम प्राेजेक्टच्या भूसंपादनासाठी पालकमंत्री गिरीश महाजन भाजपचे पाच अामदारही फारसे उत्सुक नसल्याचे चित्र अाहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन जमिनी देण्याबाबत समुपदेशन केले असले तरी त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. सत्ताधारी पक्षाच्या बड्या नेत्यांकडून समुपदेशन झाल्यास स्थानिक असल्याच्या मुद्यावर त्यांचे कदाचित शेतकरी एेकतील, अशी यंत्रणेलाही अाशा अाहे. प्रत्यक्षात त्यादृष्टीने काेणतीही मदत हाेत नसल्यामुळे याेजना रखडल्याचे चित्र अाहे.
बातम्या आणखी आहेत...