आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: शिवसेनेचे आंदोलन: नाशिकमध्ये ‘ओली’म्पिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- खराब रस्ते व खड्डे दुरुस्त न करणार्‍या मनसेला धडा शिकवण्यासाठी शिवसेनेने महापौर अँड. यतिन वाघ यांच्या प्रभागातच खड्डय़ांवर लांब उडी स्पर्धा घेऊन शुक्रवारी चांगलीच सलामी दिली. हे उपरोधिक आंदोलन मनावर घेऊन खड्डे बुजविले नाही तर जनआंदोलन करण्याचा इशारा शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी दिला.

खड्डय़ांमुळे नाशिककर बेहाल झाले असताना, दुसरीकडे तात्पुरती मलमपट्टी करणार्‍या मनसेला घेरण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरच शिवसेनाही आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षनेतेपद असूनही शिवसेना का शांत आहे, असा मुद्दा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी थेट रस्त्यावर उतरून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना आंदोलनाचा इशारा दिला. त्यानुसार, खड्डय़ांमध्ये लांब उडी स्पर्धेचे आयोजन गटनेते अजय बोरस्ते यांनी केले होते. त्याची सुरुवात रविवार कारंजावरून रेडक्रॉसकडे येणार्‍या रस्त्यावर शिवसेना मध्य नाशिकच्या पदाधिकार्‍यांनी केली.

शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता लांब उडी स्पर्धा सुरू झाली. पंधरा ते सोळा खड्डे हेरून त्यावर स्पर्धा पार पडली. शिवसेनेच्या 35 ते 40 कार्यकर्त्यांनी स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर हळूहळू नागरिकही यात सामील होण्यासाठी येऊ लागले. त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा होता. आंदोलनाचे नेतृत्व नीलेश कुलकर्णी, आशिष साबळे, संतोष कहार, महेश बिडवे, बाळासाहेब कांकेकर, महेश सोपे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केले. मोठय़ा प्रमाणात रहदारी असलेल्या व विद्यार्थ्यांची गर्दी असणार्‍या रस्त्यावरील शिवसेनेच्या या अनोख्या आंदोलनाला चांगलीच गर्दी जमल्यामुळे वाहतूक कोंडीही काही काळ झाली होती.

तर जनआंदोलन
खड्डय़ांमध्ये लांब उडी स्पर्धा हा केवळ मनसेला इशारा आहे. या उपरोधिक आंदोलनाची दखल घेऊन ठोस उपाययोजना न केल्यास शिवसेना जनआंदोलन छेडेल. त्याच्या परिणामास मनसेच जबाबदार असेल. - अजय बोरस्ते, गटनेता, शिवसेना

शिवसेनेच्या काळात खड्डेच पडले नाहीत का?
शिवसेनेच्या सत्ताकाळात शहरातील रस्त्यांवर कधी खड्डे पडले नाहीत का? सेनेच्या काळात तयार झालेल्या रस्त्यांवरच आज सर्वाधिक खड्डे आहेत. मुंबईत सेनेची सत्ता असून सर्वाधिक खड्डे याच शहरात आहेत. केवळ प्रसिद्धीसाठी मनसेच्या कामकाजावर टीका केली जाते. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश यापूर्वीच दिले. त्याप्रमाणे 20 टक्के खड्डे बुजविले गेले. पावसामुळे अन्य खड्डे बुजवता आलेले नाही. यापुढील काळात खड्डे बुजविण्यासाठी विशिष्ट डांबराचा वापर करण्यात येणार आहे. - रमेश धोंगडे, सभापती, स्थायी समिती

आणखी फोटो पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...