आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकचे पाणी बाहेर जाऊ दिल्यास आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जायकवाडी धरणात 33 टक्क्यांपेक्षाही अधिक पाणीसाठा असून, नियमानुसार या धरणात बाहेरून पाणी आणण्याची गरज नाही, असे स्पष्ट करीत गंगापूर धरणातील एक थेंबही पाणी बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जाऊ देणार नाही, अशी ग्वाही नाशिक जिल्हा पाणीप्रश्न कृती समितीच्या बैठकीत देण्यात आली. सरकारने तसा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

जायकवाडीच्या हक्काचे 9 टीएमसी पाणी (256 दशलक्ष घनमीटर) नाशिक आणि नगरमधील धरणांतून सोडण्याचा निर्णय जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत घेतला आहे. त्यानंतर पाण्याचा वाद पेटला असून, नाशिक जिल्हा पाणीप्रश्न कृती समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. जलसंपदामंत्री राजकीय अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करताना कृती समितीचे अध्यक्ष आमदार उत्तमराव ढिकले म्हणाले, कोणतेही धरण 33 टक्क्यांपेक्षा अधिक भरल्यास त्यामध्ये बाहेरून पाणी आणण्याची गरज भासत नाही. जायकवाडी धरणात ऑक्टोबरनंतर 35 टक्के पाणी असतानाही नाशिकचे पाणी पळविण्याचा घाट घातला जात आहे. म्हणजेच जलसंपदामंत्री कारण नसताना पाण्याचा वाद उकरून काढत आहेत, असेही ढिकले यांनी नमूद केले. या वेळी मनसेचे संघटक राजेंद्र डोखळे, जलतज्ज्ञ राजेंद्र जाधव, नगरसेवक दामोदर टर्ले, काशीनाथ टर्ले, सुनील ढिकले, भाऊसाहेब ढिकले, राजेश टिळे, वासुदेव काठे, सुरेश भोर, बाळासाहेब कोल्हे आदी उपस्थित होते.

पाणी देण्याचा निर्णय नाशिककरांना संकटात टाकणारा
नाशिकच्या लोकसंख्येचा विचार करता गंगापूर धरणातील पाणी अन्यत्र देण्याची गरज नाही. जायकवाडीसाठी गंगापूरचे पाणी पळविल्यास नाशिककरांचेच पाण्यासाठी हाल होतील. तसेच फलोत्पादक शेतकरीही संकटात सापडतील. जायकवाडीत 33 टक्के पाणीसाठा आहे. त्यातही 26 टीएमसी इतका मृतसाठा आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न केव्हाच निकाली निघाला आहे. गंगापूर धरणातील 60 टक्के पाणी नाशिकसाठी, तर 40 टक्के पाणी नगरसाठी आहे. नाशिक शहरातील लोकसंख्या वाढत असल्यामुळे येथील पाण्याची मागणीही वाढत आहे. अशा परिस्थितीत गंगापूर धरणातील पाणी जायकवाडीस सोडल्यास शेतकरी संकटात सापडतील. सरकारने तसा प्रयत्न केल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशाराही बैठकीत देण्यात आला.