नाशिक - एका साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दहशतवादी उल्लेख केल्याने शिवसेनाप्रणीत युवासेनेच्या वतीने पंचवटी कारंजा येथे संबंधित साप्ताहिकाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची धावपळ उडाली होती.
साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर दहशतवादी म्हणून उल्लेख केल्याच्या निषेधार्थ युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले. निषेध म्हणून साप्ताहिकाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. साप्ताहिकाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. युवा सेनेचे महानगरप्रमुख रूपेश पालकर, विश्वास तांबे, अंकुश काकड, मंगेश कापसे, शुभम घुले, तुषार मोरे, समर्थ मुठाळ, आकाश काळे, अजय पेठकर, ओंकार पवार यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लोकसभेच्याअधिवेशनात काँग्रेस खासदारांनी कामकाज बंद पाडल्याच्या निषेधार्थ भाजपतर्फे रविवारी निषेध व्यक्त करत त्र्यंबक नाका येथे रास्ता रोकाेचा प्रयत्न करण्यात आला.
विविध मुद्यांवरून लोकसभेचे अधिवेशन गाजले. स्थानिक स्वराज्य संस्था (एलबीटी) कर रद्द करून भाजप सरकारने लोकसभेत जीएसटी बिल सादर केले होते. या बिलाला काँग्रेसने लोकसभेत जाेरदार विरोध करत लोकसभेत गाेंधळ घातला होता. त्यामुळे लोकसभेचे कामकाज अध्यक्षांना वारंवार स्थगित करावे लागले होते. परिणामी जीएसटी बिल मंजूर होऊ शकले नाही. त्यामुळे काँग्रेस खासदारांच्या कामकाजाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने रविवारी त्र्यंबक नाका येथे रास्ता रोकाे करण्याचा प्रयत्न केला. गंजमाळ येथून प्रदेश संघटन सरचिटणीस रवी भुसारी, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, सरचिटणीस सुरेश पाटील, जिल्हाध्यक्ष वजिय साने, आमदार प्रा. देवयानी फरांदे, महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली निषेध रॅली काढण्यात येऊन त्र्यंबक नाक्यावरही ठिय्या देण्यात आला. या वेळी ‘काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हाय हाय’च्या घोषणा देण्यात आल्या.
पोलिस संतप्त कार्यकर्त्यांत बाचाबाची
त्र्यंबकनाका येथे निषेध रॅली आल्यानंतर भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. वाहतुकीला अडथळा होत असल्याने पोलिसांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना बाजूला बसण्यास सांगितले. त्यामुळे संतप्त झालेले कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. शहराध्यक्ष सावजी यांनी मध्यस्थी केल्याने लगेचच हा वाद मिटला.
काँग्रेसची भूमिका जनहिताविरोधी असल्यानेच छेडले आंदोलन
^भाजपसरकार केंद्रात आल्यापासून जनहिताचे निर्णय घेत आहे. काँग्रेसला जनहित नको आहे. त्यामुळे काँग्रेस खासदार महत्त्वपूर्ण बिलाच्या वेळी सभागृहात गोंधळ घालत कामकाज बंद पाडत आहेत. लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या २५ खासदारांचे निलंबन करूनही काँग्रेसने गोंधळ सुरूच ठेवला. या गोंधळाचे महत्त्वाचे विषय बाजूला राहत आहेत. त्यामुळेच आम्ही काँग्रेस खासदारांच्या कामकाजाचा रस्त्यावर उतरून निषेध केला. लक्ष्मणसावजी, शहराध्यक्ष, भाजप
महाराष्ट्रविद्यार्थी नवनिर्माण सेनेच्या वतीने रविवारी बिटको चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करणाऱ्या साप्ताहिकाचा निषेध करून त्याच्या संपादकांच्या प्रतिमेस ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. मनविसेचे जिल्हाध्यक्ष बंटी कोरडे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष श्याम गोहाड, उपजिल्हाध्यक्ष अतुल धोंगडे, ललित ओहोळ, प्रवीण पवार, नितीन पंडित, उमेश भाेई आदी आंदोलनात सहभागी झाले होते.