आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक शहरात काँग्रेस पक्षश्रेष्ठींना ‘घरचा आहेर’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आयोजित उत्तर महाराष्ट्र मेळाव्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रभारी मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी ‘15 वर्षांच्या सरकारच्या काळात आम्हाला काय दिले,’ असा थेट सवाल करीत ‘घरचा आहेर’ दिला. यामुळे काही वेळ बोलती बंद झालेल्या कृषिमंत्री व महसूलमंत्र्यांनी राज्य सरकारच्या विविध योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्याचे आवाहन करीत भाषण आटोपते घेतले.

कालिदास कलामंदिरात झालेल्या मेळाव्यात काँग्रेस महासचिव तथा राज्य प्रभारी मोहन प्रकाश म्हणाले की, केंद्रात धर्मांध शक्तींचे सरकार स्थापन झाले असून, काँग्रेसने आदिवासी, शेतक-यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय, केलेले कायदे मोडीत काढण्याचे काम केले जात आहे. गाझा पट्टीत अमानुषपणे नागरिकांची हत्या केली जात असताना पंतप्रधान गप्प आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये दंगली सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत लोकांची दिशाभूल करून सत्ता मिळवली असली तरी कार्यकर्त्यांनी खचून न जाता कामाला लागावे. मंत्र्यांनी गावागावांत जाऊन जनसंपर्क वाढवावा.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, आमदार निर्मला गावित, माणिकराव कोकाटे, माजी मंत्री सुरूपसिंग नाईक, आमदार शिरीष चौधरी, सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील, जयप्रकाश छाजेड, ज्ञानेश्वर गायकवाड, भाई नगराळे, डॉ. हेमलता पाटील, डॉ. ममता पाटील, दशरथ पाटील, आसिफ शेख आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रभारी शहराध्यक्ष शरद आहेर यांनी केले.
गटबाजीचे दर्शन : मेळाव्याकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष, त्यांच्या गटाचे अनेक पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, पदाधिका-यांनी पाठ फिरवली होती.

बारा बलुतेदार महासंघाची निदर्शने
बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष अरुण नेवासकर, कल्याण दळे, चंद्रकांत गवळी, किशोर सूर्यवंशी आदींनी प्रवेशद्वारावर मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देण्यासाठी जाऊ न दिल्याने घोषणाबाजी व निदर्शने केली. त्यांच्याकडील पोस्टरही पोलिसांनी जप्त केले. बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ, विधान परिषदेवर प्रतिनिधित्व आदी मागण्यांच्या घोषणा त्यांनी दिल्या.

मंत्र्यांच्या पत्रांनाही दाद नाही...
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विकासकामांचा पाढा वाचत दुष्काळ, गारपीट, पीक नुकसानभरपाई देताना 12 हजार कोटींपर्यंत मदत दिल्याचे सांगितले. शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, रोजगार प्रत्येक क्षेत्रासाठी दिलेल्या निधीचा हिशेब सादर केला. त्याचवेळी काही कार्यकर्त्यांनी ‘सर्वांना दिले; पण कार्यकर्त्यांना काय दिले?’ असा सवाल करताच टाळ्या वाजत हशाही पिकला. काही काळ निरुत्तर झालेल्या मंत्र्यांनी ‘कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पदे मिळाली असतील, सरकार दरबारी कामे झाली असतील’, असे सांगताच ‘सरकारी अधिकारी तुमच्या पत्र-चिठ्ठ्यांना दाद देत नाहीत,’ असे प्रतिउत्तर आले. यावर विखे पाटील यांनी अधिकारी-कर्मचा-यांची मानसिकताच कामे करण्याची नसल्याचे सांगत त्यांच्यावर खापर फोडले.

मुख्यमंत्री-प्रदेशाध्यक्षांवर निवेदनांचा वर्षाव
मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना भेटण्यासाठी केबीसी गुंतवणूकदार, बारा बलुतेदार महासंघ, धनगर समाजाचे शिष्टमंडळ व अन्य काही संघटनांचे पदाधिकारी कालिदास कलामंदिराच्या प्रवेशद्वारावर ताटकळत उभे होते. दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा येण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना हटविले. त्यामुळे काही काळ गोंधळ झाला. याचेच पडसाद मेळाव्यातही उमटले. मुख्यमंत्री व्यासपीठावर येताच अनेकांनी निवेदने देण्यास सुरुवात केली. व्यासपीठावरील वाढती गर्दी पाहून खुद्द मोहन प्रकाश यांनाच गोंधळ थांबवण्याची सूचना करावी लागली. काही उत्साही कार्यकर्ते नेत्यांच्या भाषणादरम्यानच ‘सोनिया गांधी आगे बढो’, तसेच मुख्यमंत्री-प्रदेशाध्यक्षांच्या नावानेही घोषणा देत असल्याने गोंधळात भर पडत गेली.
गावित कुटुंबीयांना राष्ट्र वादीचा आशीर्वाद
क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी म्हणाले की, कार्यकर्त्यांनी काय मिळाले हे विचारण्याची वेळ आता नसून, कामाला लागले पाहिजे. नंदुरबार जिल्ह्यात सहाही जागांवर डॉ. विजयकुमार गावित यांचे कुटुंबीय उभे राहणार असून, त्यांना राष्ट्र वादी काँग्रेसचाच आशीर्वाद असल्याने आघाडी कशी करायची? त्यासाठी स्वबळावरच लढावे, अशी मागणीही त्यांनी केली.