आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Public Information, Latest News In Divya Marathi

सावानाच्या जनमाहिती अधिकार्‍यांना पुन्हा दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- तीनच दिवसांपूर्वी सावानाचे जनमाहिती अधिकारी कर्नल आनंद देशपांडे यांना माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांनी दाखल केलेल्या प्रकरणात माहिती आयोगाने दंड ठोठावल्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा दुसर्‍या प्रकरणात दहा हजार रुपये दंड आयोगाच्या नाशिक खंडपीठाने ठोठावला आहे.

निर्धारित वेळेत अर्जदाराने मागितलेली माहिती न दिल्याबद्दल सार्वजनिक वाचनालयाचे जनमाहिती अधिकारी कर्नल आनंद देशपांडे यांना तब्बल 10 हजार रुपयांचा दंड राज्य माहिती आयुक्त पी. डब्ल्यू. पाटील यांच्या खंडपीठाने ठोठावला. सार्वजनिक वाचनालयाचे सभासद र्शीकांत बेणी यांनी माहिती अधिकाराचा वापर करत वाचनालयाकडे 16 जून 2012 ते 1 ऑक्टोबर 2012 यादरम्यान वेगवेगळ्या 5 अर्जांद्वारे वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाच्या कामकाजाबाबत वेगवेगळी माहिती मागितली होती. यात कार्यकारी मंडळाच्या सभेच्या इतिवृत्ताच्या प्रती, न्यायालयातील वकील बदलण्याबाबत करण्यात आलेल्या ठरावांच्या प्रती, मु. शं. औरंगाबादकर सभागृह इमारत पूर्णत्वाचा दाखला, महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सावानाला पाठविलेल्या नोटिशीची प्रत आदी माहिती बेणी यांनी मागितली होती. ही माहिती कायद्यानुसार 30 दिवसांत जनमाहिती अधिकार्‍यांनी देणे बंधनकारक असते.
मात्र, ही माहिती वेळेत न दिल्याने बेणी यांनी अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांच्याकडे अपील दाखल केले. मात्र, त्यांनीही याविषयी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे बेणी यांनी पुन्हा खंडपीठाकडे वरील विषयानुसार वेगवेगळे अपील दाखल केले. यावर आयुक्त पाटील यांनी देशपांडे यांनी माहिती निर्धारित वेळेत उपलब्ध करून दिली नाही, अपील दाखल केल्यानंतर बर्‍याच उशिराने माहिती उपलब्ध करून दिल्याचे नोंदविले. तसेच, विलंबाने माहिती पुरविल्याने शास्तीच्या कारवाईनुसार प्रत्येकी 2 हजार रुपये याप्रमाणे 10 हजार रुपये एवढी शास्ती देशपांडेंकडून वसूल करावी, असे आदेश आयुक्त पाटील यांनी दिले आहे. या संदर्भात देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सध्या यासंदर्भात अधिक बोलू इच्छित नसल्याचे सांगितले.