नाशिकरोड- रेल्वेस्थानकावर सार्वजनिक खासगी सहभागिता (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप-पीपीपी) योजनेंतर्गत खासगी अनारक्षित सर्वसाधारण तिकीट विक्री केंद्र सुरू झाले आहे. मात्र, हे केंद्र स्थानकापासून एक किलोमीटरवर सुरू करण्याचा नियम धाब्यावर बसविण्यात आला आहे.
रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी चार महिन्यांपूर्वी रेल्वेत पीपीपी योजना सुरू करण्याची घोषणा केली होती, त्यानुसार पहिले जनसाधारण तिकीट बुकिंग सेवा (जेटीबीएस) केंद्र नाशिकरोड स्थानकावर सुरू झाले आहे. या केंद्रास संपूर्ण देशभरातील अनारक्षित तिकीट विक्रीची परवानगी आहे. रेल्वेच्या तिकीट केंद्रावर मिळणाऱ्या तिकिटापेक्षा प्रवाशांना एक रुपया या केंद्रावर अधिक मोजावा लागणार आहे.
घाईच्या वेळी रेल्वेस्थानकापासून लांब राहणाऱ्या प्रवाशांची गाडी तिकीट घेताना केंद्रावरील रांगेमुळे सुटून जाते. यासाठी हे अनारक्षित खासगी तिकीट विक्री केंद्र रेल्वेस्थानकापासून एक कि.मी. अंतरावर उभारावे, असा नियम आहे. परंतु, केंद्राला परवानगी देताना हा नियम धाब्यावर बसवून रेल्वेस्थानकाच्या आवारातच खासगी केंद्र सुरू झाल्याने कोणते रेल्वेचे आणि कोणते खासगी केंद्र, हा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. स्थानकावर सध्या अनारक्षित तिकिटांच्या आठ खिडक्या आहेत. यात खासगी दोन खिडक्या सुरू झाल्याने दहा खिडक्या झाल्या आहेत.
रांगेत उभे राहण्याचा त्रास टळणार
रेल्वेने खासगी तिकीट केंद्राला परवानगी देऊन प्रवाशांचा तिकिटाच्या रांगेत उभे राहण्याचा त्रास कमी केला आहे. घाईच्या वेळी तिकिटासाठी रांग असल्यास खासगी केंद्र योग्य पर्याय असून, एक रुपयात रांगेचा त्रास कमी झाला आहे. गणेश जाधव, प्रवासी, बोईसर