आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादविरोधी जागृती उपक्रम स्तुत्य : निकम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सामान्य माणसाचा न्यायपालिकेवर प्रचंड विश्वास आहे आणि हा विश्वास टिकवून ठेवण्याचे काम पोलिस यंत्रणा प्रामुख्याने करते. २६-११ च्या हल्ल्याची सुनावणी हे या न्यायव्यवस्थेपुढील महत्त्वाचे आव्हान होते. ते पेलण्यासाठी तब्बल ९८ पोलिस अधिकारी पूर्णवेळ कार्यरत होते, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.
महाराष्ट्र पोलिस अकॅडमी, नाशिक यांच्यातर्फे आयोजित लक्ष्मण विष्णू केळकर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. बुधवारी (दि. ७) या व्याख्यानमालेचे सहावे पुष्प गुंफले गेले. दरवर्षी या व्याख्यानमालेत विविध वक्त्यांची व्याख्याने अायाेजित केली जातात. यावर्षी उज्ज्वल निकम यांनी ‘२६-११ हल्ल्यातील आरोपींविरुद्धचा लढा’ या विषयावर बोलताना उपस्थित भावी पोलिसांना महत्त्वाचे सल्ले दिले. ते म्हणाले की, आजपर्यंत भारतात झालेल्या सगळ्या अतिरेकी खटल्यांपैकी अतिशय महत्त्वाचा खटला २६-११चा होता. या वेळी पोलिसांनी राखलेली गुप्तता अत्यंत महत्त्वाची ठरली.
ज्यामध्ये कसाब आजारी असताना तो दोन दिवस सरकारी रुग्णालयात होता, त्याने तीन दिवस दंडाधिकाऱ्यांसमोर हजेरी लावली होती. तसेच कसाबव्यतिरिक्त मारले गेलेले नऊ अतिरेकी कुठे दफन केले गेले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कसाबच्या फाशीची तारीख काय होती. या गोष्टींचा समावेश हाेताे. कसाबसारख्या मुरलेल्या गुन्हेगाराची तपासणी करताना पोलिसांनी विशेष दक्षता घ्यायला हवी, कसाबने असंख्य वेळा त्याचे जबाब बदलले, त्याला भारतीय न्यायव्यवस्थेची पूर्ण माहिती होती. त्यामुळे न्यायव्यवस्थेत स्वत:ला कमी दोषी दाखवण्यासाठी त्याच्याकडे उत्तरे तयार होती. अशा वेळी पोलिसांची भूमिका महत्त्वाची होती. मुंबईतही हल्ल्यावेळी त्याला कुणीही अडवणार नसल्याच्या सूचना त्याला कराचीहून मिळाल्या होत्या. मात्र, पोलिसांनी या सर्व गाेष्टींचा उत्तम प्रतिकार केला, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र पोलिस अकॅडमीचे संचालक नवल बजाज, तसेच लक्ष्मण केळकर यांचे सुपुत्र विजय केळकर यांच्यासह अकादमीतील भावी पोलिस आणि प्रशिक्षक माेठ्या संख्येने उपस्थित होते.
कसाबच्या बिर्याणीचा गौप्‍यस्‍फोट-सोशलमीडियावर फिरणारा सगळ्यात प्रसिद्ध ठरलेला मेसेज म्हणजे भारत सरकारने कसाबच्या मटण बिर्याणीवर केलेला खर्च. मुळात मी त्याला भेटायला गेलो असताना माझ्या हातातली राखी पाहून कसाबने विचारले, ‘बादशाह, हा धागा कसला..’ यावर मी त्याला राखीपौर्णिमेची माहिती दिली. त्याने मान खाली घातली आणि लोकांचा गैरसमज झाला की, तो बहिणीच्या आठवणीने रडला. मग, कसाब बालगुन्हेगार आहे, त्याची सहानुभूती वाटू लागली. त्याच्या गुन्ह्याला असे वळण येऊ नये, म्हणून मीच बाहेर मीडियाला सांगितले की, त्याने मटण बिर्याणी मागितली. मग काय? लोक पेटले की, हा नराधम गुन्हा करून बिर्याणी मागतो. माझा हेतू साध्य झाला, असे म्हणत निकम यांनी बिर्याणीची खरी अाणि गंमतीशीर कथा सांगितली