आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३६ हजार शौचालयांच्या सीट्ससाठी नाशिक महापालिकेकडून नियोजन सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, नाशिक शहरासाठी ३६ हजार शौचालयांचे सीट्स (भांडे) गरजेचे असल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणाअंती काढण्यात आला आहे.
‘दिव्य मराठी’ने ‘सहकारातून समस्यामुक्ती’ या अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था त्यामुळे खासकरून महिलांची होणारी परवड यावर प्रकाश टाकला होता. तसेच, खासगीकरणाचा सुचवलेला उपायही बहुतांश मान्य झाला असून, महापालिकेची नाजूक आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, आमदार वा नगरसेवक निधीतून शौचालयांची कामे हाती घेण्याचे नियोजन केले जात आहे.

मुंबई, पुण्यानंतर वेगाने विकसित होणाऱ्या नाशिकमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली होती. रस्त्यालगत, बसस्थानक, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा येथील शौचालयांत पाय ठेवणेही मुश्कील झाले होते. मुळात वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत शहरात स्वच्छतागृहांची संख्या अत्यंत कमी होती.
किमान ४० लोकांमागे एक याप्रमाणे शौचालयात सीट (भांडे) असणे गरजेचे आहे. मात्र, महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या जवळपास १५ लाखांच्या घरात असताना, भांड्यांची संख्या जेमतेम साडेपाच हजारांपर्यंतच होती. त्यातील अनेक स्वच्छतागृहांनी माना टाकल्याचे लक्षात आणून देत लोकसंख्येच्या प्रमाणात ४० हजार भांड्यांची गरज असल्याचे गणितही सोदाहरण मांडले होते. त्याची दखल घेत आरोग्य विभागाने लोकसंख्येच्या प्रमाणात शौचालयांची त्यातील भांड्यांची संख्या निश्चित करण्यासाठी पावले उचलली. यासंदर्भात २०११ मधील लोकसंख्येचा विचार करून महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता शौचालयांची भांड्यांची संख्या निश्चित केली आहे.महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, आमदार वा नगरसेवक निधीतून शौचालयांची कामे हाती घेण्याचे नियोजन केले जात आहे.
स्लमसाठी हवेत एक लाख २४ हजार भांडे

महापालिका क्षेत्रात जवळपास चार लाख २३ हजार ३९५ लोक हे आर्थिक दुर्बल वा मागास वस्तीत राहतात. त्यांच्यापैकी लाख ९९ हजार व्यक्तींची अधिकृत स्लमधारक नोंद असून, त्यांना नऊ हजार शौचालयांची भांडी लागणार आहेत. तर, २४ हजार व्यक्तींची नोंद नसून, त्यांच्यासाठी ६०० भांड्यांची गरज लागेल, असे अनुमान काढले आहे.
महिलांसाठी उभारणार १३५ विशेष स्वच्छतागृहे

शहरात वावरताना स्वच्छतागृहांअभावी महिलांची गैरसोय होते. मूत्रपिंडाशी संबंधित आजार वाढतात त्याचा प्रकृतीवर होणारा परिणाम लक्षात घेता, महिलांसाठी विशेष स्वच्छतागृहे असावीत, यावर ‘सहकारातून समस्यामुक्ती’ या अभियानांतर्गत प्रकाश टाकला होता. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात शहरातील १३५ ठिकाणी महिलांसाठी विशेष स्वच्छतागृहे उभारण्याचे नियोजन केले आहे.