आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिसाळलेल्या कुत्र्याचा सिडकाेत धुमाकूळ; लहान मुलांसह 20 जणांचे ताेडले लचके; लाठ्या-काठ्यांनिशी नागरिक रस्त्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने बालकांना अशा माेठ्या जखमा झाल्या. - Divya Marathi
पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने बालकांना अशा माेठ्या जखमा झाल्या.
नाशिक- सिडकोतील राजरत्ननगर भागात पिसाळलेल्या श्वानाने महाराष्ट्रदिनी लहान मुलांसह तब्बल २० नागरिकांना चावा घेत जखमी केले. या घटनेमुळे सतर्क झालेल्या शेकडो नागरिकांनी एखादा जंगली प्राणी पकडावा तसे हाती लाठाकाठ्या घेत रस्त्यावर उतरून तीन-चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर श्वानाला जेरबंद केले. त्याला महापालिकेच्या ताब्यात देण्यात आल्यानंतरच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 
 
साेमवारी (दि. १) लहान मुले सुटीचा आनंद घेत होते. कोणी चौकात, कोणी गल्लीत तर कोणी आपल्या घरासमोर खेळत होते. याचवेळी सप्तशंृगी चौक, दुर्गा चौक भागात अचानक एक पिसाळलेला श्वान आला. त्याने प्रथम रोहित पाटील या सहा वर्षांच्या मुलाच्या गुडघ्याजवळ लचके तोडले. हा प्रकार पाहून नागरिकांनी काठीने श्वानाला हाकलले. मात्र, त्याने पुढे जाऊन चेतना पाटील या दीड वर्षाच्या मुलीला लक्ष्य केले. त्यानंतर या पिसाळलेल्या श्वानाचा जो धुमाकूळ सुरू झाला, तो थांबेचना. जो अडवायला जाईल, त्याच्यावर श्वान हल्ला करीत असल्याने पळापळ झाली. श्वान थेट लचके तोडत असल्याने अखेर एखाद्या जंगली श्वापदाला मारण्याची तयारी करावी, त्याप्रमाणे अनेकांनी आपल्या हातात लाठ्या-काठ्या घेतल्या आणि सुरू झाली त्याला पकडायची मोहीम. काही नागरिकांनी नगरसेविका रत्नमाला राणे हा प्रकार कळवला. नगरसेवक नीलेश ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते भूषण राणे, संदीप पवार, अमोल कदम यांच्यासह एकता मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी जखमी नागरिकांना रुग्णालयात नेले.
 
नगरसेविका राणे यांनी तत्काळ महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून श्वान पकडणारे वाहन बोलावून घेतले. पिसाळलेल्या श्वानाला पकडण्यात नागरिकांना यश आल्यामुळे अनेक नागरिक जखमी होण्यापासून वाचले. मात्र, त्याअाधी प्राजक्ता कांबळे (वय ५), रोहित पाटील (७), सोहम वाघ (४), चेतना पाटील (दीड वर्ष), साई पाटील (३), हेमंत दोंदे (६), किशोर मोरे यांच्यासह सुमारे २० नागरिक श्वानाच्या चाव्याने जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालय खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 
सुदैवाने प्राण वाचले 
- माझा मुलगाबाहेर खेळत होता. अचानक आलेल्या श्वानाने त्याच्या पायाचे लचके तोडले. नागरिक मदतीला धावल्याने श्वानाने त्याला सोडले, अन्यथा त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. -वैशाली पाटील, जखमीची आई 
 
कायमस्वरूपी श्वान वाहन असावे 
- पिसाळलेले जखमी श्वान पकडण्यासाठी कायमस्वरूपी वाहन असावे. ते सेवेत २४ तास असावे. कोणत्याही घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखले व्हावे नागरिकांना मदत करावी.- रत्नमाला राणे, नगरसेविका 
 
अजूनही मनातून भीती गेलेली नाही 
-असे मोकाट श्वान खूपच धोकेदायक आहेत. त्यांचा प्रशासनाने बंदोबस्त करावा. यात माझा मुलगा जखमी झाला. भीती अजूनही अामच्या मनातून गेलेली नाही. -रूपाली दोंदे, जखमीची आई 
 
सिडकाेतच सर्व सुविधा मिळाव्यात 
- या घटनेननंतर नागरिक मोरवाडीतील रुग्णालयात उचारासाठी गेले होते. मात्र, त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविले. यासाठी सिडकाेतच सर्व सुविधा मिळाव्यात. -नीलेश ठाकरे, नगरसेवक 
 
थाेरल्या बहिणीने वाचविले धाकटीला 
चेतना पाटील ही दीड वर्षाची चिमुरडी आपल्या घरासमोर थाेरली चुलत बहीण अंकितासोबत खेळत होती. चेतना अंकिताच्या कडेवर असतानाही श्वानाने तिच्या पायाला चावा घेत तिला ओढण्याचा प्रयत्न केला. जीवाची पर्वा करता अंकिताने चेतनाला श्वानाच्या ताब्यातून सोडविले. हा प्रकार इतर नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, श्वानाने पुढे पळत असतानाही इतरांना जखमी केले. 
 
पुढील स्लाईडवर वाचा नागरिकांच्या प्रतिक्रिया.... 
बातम्या आणखी आहेत...