आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात लैंगिक शोषणविरोधी अभ्यासक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पारंपरिक शिक्षण पद्धतीचा प्रत्यक्षात अपेक्षेप्रमाणे विद्यार्थ्यांना विशेष उपयोग होत नसल्याने आता पुणे विद्यापीठाने पुढील शैक्षणिक वर्षापासून पदवी आणि पदव्युत्तरचे अभ्यासक्रम बदलण्याचाच निर्णय घेतला आहे. त्यात प्रामुख्याने सामाजिक बांधिलकी असलेल्या विषयांसह कौशल्य विकास आणि लैंगिक शोषणासंबंधीच्या अभ्यासक्रमांचा त्यात अंतर्भाव राहणार असल्याचे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी नाशिक येथे सांगितले.

चालू वर्षापासून क्रेडिट प्रणाली तर लागू केलीच आहे. कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने रोजगार मिळण्यासाठी फायदा होईल. हा अभ्यासक्रम औद्योगिक, तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रात त्यांना कशाची गरज आहे, हे हेरूनच त्यांच्याच मदतीने तयार करण्यात येईल. जेणेकरून विद्यार्थ्यांना तत्काळ रोजगार मिळण्याची सुविधा उपलब्ध होईल. सायबर क्राइमच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यासंदर्भातील तसेच महिलांवरील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटना पाहता लैंगिक शोषणासंबंधीच्या अभ्यासक्रमांचाही यात समावेश केला जाईल.

प्रथम वर्ष पदवी, पदव्युत्तरचे अभ्यासक्रम बदलणार : अभ्यासक्रम बदलास जून 2014 पासून सुरुवात होईल. त्यामध्ये प्रत्येक शाखेच्या प्रथम वर्ष पदवीचे (अंडर ग्रॅज्युएट) अभ्यासक्रम बदलले जातील. तसेच, पदव्युत्तर पदवीच्या (पोस्ट ग्रॅज्युएशन) प्रथम वर्षाचे अभ्यासक्रम बदलण्यात येतील. पुढच्या वर्षी द्वितीय वर्षाचे आणि त्यानंतर पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमांमध्ये बदल करण्यात येतील.

अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठातच जावे लागते. अनेकांना त्यामुळे शिक्षणही घेता येत नाही. परंतु, आता असे होणार नसून, या दोन्ही शाखांचे प्रत्येक महाविद्यालयातच पदव्युत्तर पदवीचे विभाग कार्यरत राहणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले.