आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विद्यापीठाचा नाशकात ‘कॅम्पस’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांची वाढलेली संख्या पाहता, प्रशासकीय कामकाजासाठी नाशकात उपकेंद्राऐवजी स्वतंत्र विद्यापीठ कॅम्पस उभारला जाणार आहे. दिंडोरी तालुक्यातील शिवनई शिवारात त्यासाठी 62.5 एकर जागाही निश्चित झाली असून, जमीन अधिग्रहण ते अकृषक परवानगीसह सर्वच प्रक्रिया येत्या 15 दिवसांत पूर्ण केली जाईल. महिनाभरात प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार आहे. त्यामुळे आगामी वर्षभरात पुणे विद्यापीठाचे नाशिकमधील कॅम्पस प्रत्यक्षात कार्यान्वित होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

मुंबईत पालकमंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी विलास पाटील व प्रभारी कुलगुरू डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांची संख्या 700हून अधिक आहे. तो प्रशासकीय कामकाजाचा भार कमी होण्यासाठी सध्या नाशकात विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू आहे. दुसरीकडे शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या विस्तारामुळे नाशिक एज्युकेशनल हब म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे उपकेंद्रही कमी पडण्याची शक्यता असल्याने कॅम्पसच सुरू करण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. राज्य शासनाकडून मान्यता मिळणार, असे ग्राह्य धरून काम सुरू होण्यास आवश्यक त्या परवानग्या देण्याचे आदेशही या वेळी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले.

कॅम्पस रविवार कारंजापासून 9 किलोमीटरवर
कॅम्पस रविवार कारंजापासून नऊ किलोमीटरवर आहे. दिंडोरीरोडवर आरोग्य विज्ञान विद्यापीठापासून पाऊण किलोमीटरवर उजव्या बाजूला वळण रस्ता आहे. त्या मार्गाने आणखी पाऊण किलोमीटरवर हे कॅम्पस साकारेल.

असा असेल कॅम्पस :-
हा कॅम्पस म्हणजे मिनी विद्यापीठच असेल. तेथे पुणे विद्यापीठात उपलब्ध असणार्‍या सर्व सुविधा आणि प्रशासकीय प्रक्रिया होतील. विद्यापीठाप्रमाणे सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध असतील. त्यामुळे पुण्यातील मुख्यालयात संपर्क साधण्याची आवश्यकता भासणार नाही.

संशोधनापासून सर्वच अभ्यासक्रमांचा समावेश
संशोधनपर अभ्यासक्रम तयार करण्यावर विद्यापीठाने भर देण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी कॅम्पसमध्ये अत्याधुनिक संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याबरोबरच मान्यताप्राप्त पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू होतील. त्यात अभियांत्रिकी, औषधनिर्माण, व्यवस्थापन, विज्ञान, वाणिज्य, कला असे सर्वच अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.

पुणे विद्यापीठातर्फे 33 कोटींची तरतूद
इमारत बांधकामासह सर्वच बाबींसाठी पुणे विद्यापीठाने या कॅम्पसकरिता 33 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यात वाढही केली जाईल; मात्र तरीही आवश्यकता भासल्यास राज्य शासनाचा शिक्षण विभागदेखील आर्थिक मदत करणार आहे, तशी अपेक्षाही भुजबळांनी टोपेंकडे व्यक्त केली. त्यास त्यांनी तत्काळ सहमती दर्शविली.

वर्षभरानंतर मिळाली चालना
पुणे विद्यापीठावरील भार वाढत असल्याने त्यावर उपाय शोधण्यासाठी नेमलेल्या डॉ. अनिल काकोडकर समितीने विद्यापीठाचे विभाजन करण्याचा अहवाल शासनास सादर केला होता. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यास एक केंद्र असावे, असेही सूचित केले होते. नाशकात जागेअभावी हा प्रस्ताव 2012 पासून पडून होता.

नाशिकातील महाविद्यालये
कला, विज्ञान, वाणिज्य- 85, विधी- 4, अभियांत्रिकी- 17, स्थापत्य- 3, शिक्षणशास्त्र- 40, फार्मास्युटीकल-14, एम.बी.ए.- 33, संशोधन केंद्र- 12.