आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune University's Nashik Sub Station Starting E Libraray Facility

पुणे विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्रामध्ये सुरू होणार ई-लायब्ररी सुविधा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पुणे विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्रामध्ये महिनाभरातच विद्यार्थ्यांसाठी ई-लायब्ररीची सुविधा सुरू करण्यात येणार असून तेथील सुविधांद्वारे संशोधनाचा दर्जा सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी विद्यापीठाकडे पाठवण्यात आलेल्या 18 लाखांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असल्याची माहिती केंद्राचे समन्वयक प्रा. एस. जी. श्रीवास्तव यांनी दिली.

सदर प्रस्तावित रकमेतून 20 संगणक आणि इंटरनेट कनेक्शन, वीजबिल व पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. विविध विषयांचे मोड्यूल्स, ई-बुक्स याबरोबरच संशोधनास चालना मिळावी या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे राबवण्यात येत असलेल्या इन्फ्लिबनेटचा वापरदेखील विद्यार्थ्यांना या माध्यमातून करता येईल. ग्रंथालयाचे आधुनिकीकरण, माहितीच्या देवाणघेवाणीचे उत्तम केंद्र तसेच राष्ट्रीय नेटवर्कद्वारे जोडले जाऊन शिष्यवृत्ती व अन्य सुविधा विद्यार्थ्यांना पुरवण्याचा मानस यामागे आहे. शहरी विद्यार्थ्यांपेक्षाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या ई-लायब्ररीचा अधिक उपयोग होईल. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातील ज्ञानाची कवाडे या माध्यमातून खुली होतील.


काय आहे इन्फ्लिबनेट ?
भारतातील विविध विद्यापीठांमध्ये एम. फिल. व पीएचडी पदवीसाठी केल्या जाणार्‍या संशोधनाचे लघुप्रबंध व प्रबंध विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शोधगंगा प्रकल्पांतर्गत इन्फ्लिबनेटच्या संकेतस्थळावर अपलोड करणे शक्य होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी नोंदणी करताना संशोधन आराखडा कसा असावा, प्रबंध कसा लिहावा याची अनेक उदाहरणे विविध विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहेत. या सुविधेमुळे संशोधनाचा तकलादू दर्जा सुधारण्यात, तसेच वाड्मयचौर्यावर नियंत्रण आणणेदेखील आयोगाला शक्य झाले आहे. या सुविधेत सध्या कोचीन विद्यापीठ देशात, तर पुणे विद्यापीठ राज्यात अग्रेसर आहे. महाविद्यालयांना ही सुविधा हवी असल्यास त्यासाठी माफक नोंदणीशुल्क भरणे आवश्यक आहे.