आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅगिंगप्रकरणी कॉलेजची तोडफोड; अज्ञात हल्लेखोरांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सातपूरजवळील विद्यावर्धिनी आयडीआय या महाविद्यालयात राष्ट्रवादीच्या एका पदाधिका-याच्या मुलीची रॅगिंग एका उद्योजकाच्या मुलीने केल्याच्या प्रकारावरून दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादाने बुधवारी नवीन वळण घेतले. कथित रॅगिंग झालेल्या मुलीने प्रवेश काढून घेतल्यानंतर 15 ते 20 जणांच्या अज्ञात टोळक्याने महाविद्यालयाची जबरदस्त तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व दोन्ही बाजूच्या तक्रारी जाणून घेत हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्याचा सहभाग असल्याचे सांगितले गेले; मात्र महाविद्यालयाकडून स्पष्ट तक्रार दिली गेली नाही. एकूणच दिवसभरातील घटनाक्रम व मुंबईस्थित वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपाच्या चर्चेमुळे या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्नही लपून राहिला नाही. या महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील काही विद्यार्थी-विद्यार्थिनींची रॅगिंग केल्याची तक्रार मंगळवारी व्यवस्थापनाकडे आली. हे प्रकरण समजल्यावर राष्ट्रवादीचे एक आमदार व काही पदाधिका-यांनी प्राचार्यांची भेट घेतली. यात रॅगिंगचा आरोप असलेली विद्यार्थिनी शहरातील एका उद्योजकाशी संबंधित असल्याचे पुढे आले.
संबंधित उद्योजक यापूर्वी याच पक्षाचा निकटवर्तीय असल्याने मध्यस्थीनंतर या प्रकरणावर पडदा पडला. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ आमदारानेही उद्योजकाच्या बाजूने भूमिका बजावत समेट घडवून आणल्याची चर्चा होती. हे प्रकरण निवळल्याचे चित्र असताना बुधवारी संबंधित मुलीने प्रवेश रद्द केला व ती महाविद्यालयाबाहेर गेल्यानंतर काही क्षणातच मोटारीतून आलेल्या 15 ते 20 हल्लेखोरांनी महाविद्यालयावर दगडफेक सुरू केली. महाविद्यालयात घुसून एलसीडी टीव्ही व फर्निचरही तोडले.

उपायुक्त डॉ. स्वामी, सहायक आयुक्त हेमराज राजपूत यांच्यासह पोलिसांनी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. महाविद्यालयाकडून मंजू समीर बेळे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी याबाबत माहिती दिली की, संबंधित मुलीकडून रॅगिंग झाल्याची तक्रार मंगळवारी प्राप्त झाली. पालकांशी चर्चेनंतर समेट झाला. मात्र, संबंधित मुलीने प्रवेश रद्द केल्यावर काही हल्लेखोरांनी महाविद्यालयाची मोडतोड केली. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनाक्रमाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, संबंधितांचा शोध घेतला जाईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेढे यांनी सांगितले.

रॅगिंगची मुलीकडून तक्रार : संबंधित मुलीने रॅगिंग झाल्याबाबत सातपूर पोलिसांकडे अर्ज दिला मात्र, हे प्रकरण प्रथम महाविद्यालयाच्या अखत्यारीत येत असल्याने व्यवस्थापनाला अर्ज देण्यात आला. या अर्जात म्हटले की, संबंधित विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांना उभे करून नाव-गाव विचारले. त्यात चुकल्यानंतर फिरकी घेत अपमान केला. दरम्यान, यासंदर्भात मंजू बेळे यांना विचारले असता त्यांनी रॅगिंगचा प्रकार घडलाच नसल्याचे ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले. तर, सहायक आयुक्त राजपूत यांनी या तक्रारीची शहानिशा महाविद्यालय व्यवस्थापनामार्फत केली जाईल व त्यांनी दखल न घेतल्यास पोलिस कारवाई करतील असे स्पष्ट केले.
तक्रारदारांचीही टोलवाटोलवी
या कॉलेजची तोडफोड झाल्यानंतर प्राचार्य, संचालक यांनी तसेच फिर्यादीतही हल्लेखोर कोण याचा उल्लेख नाही. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या काही पदाधिका-यांची चौकशी झाली. मात्र, त्यांनी बैठकीत व्यस्त असल्याचे पटवून दिल्याने हल्लेखोर त्यांच्यांशी संबंधित असल्याचा उलगडा झाला नाही. तक्रारदारांना माध्यमांनी विचारले असता त्यांनीही टोलवाटोलवीची भूमिका घेतली. जागा मालक गोल्डी आनंद यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी हल्लेखोर कोण हे मीडियानेच शोधावे, असे सांगितले.

रॅगिंगची चौकशी करू
- महाविद्यालयात अ‍ॅण्टी रॅगिंग कमिटी कार्यरत असून, या प्रकरणासंदर्भातील तक्रारीची चौकशी केली जाईल. तोडफोडीचा प्रकार शरमेचा असून, लोकांना संरक्षण देण्याची भूमिका राजकीय पक्षांची आहे. तेच दहशत निर्माण करत आहेत. विजय सोहनी, प्राचार्य, विद्यावर्धिनी, आयडीआय

दहशतीचा प्रयत्न
- रॅगिंग प्रकरणावरून मंगळवारी मतभेद मिटले होते. बुधवारी काही हल्लेखोरांनी तोडफोड केली. दहशत निर्माण करण्याचा हा प्रकार आहे.
गोल्डी आनंद, मालमत्ताधारक