आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोंदूबाबाच्या घराच्या झडतीत अाढळली तंत्र-मंत्राची पुस्तके, अंनिस व पोलिस पथकाची संयुक्त कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - प्रतिष्ठित कुटुंबाला सुमारे पंधरा लाखांना गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाच्या घरी तंत्रमंत्र विद्येची पुस्तके, काळ्या बाहुल्या, काळे कपडे आणि उग्र वासाच्या अत्तराच्या बाटल्या आढळून आल्या. बुधवारी (दि. १५) सरकारवाडा पोलिस आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी भोंदूबाबाच्या वांगणी (अंबरनाथ, जि. ठाणे) येथील घरी ही कारवाई केली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजरोडवरील एका प्रतिष्ठित कुटुंबातील दोन भावांमध्ये भिंत काढण्यावरून वाद होता. वीरेंद्र मुथा यांना संशयित मांत्रिक उदयराज रामआश्रम पांडे (रा. वांगणी, अंबरनाथ, जि. ठाणे) याने ‘तुमच्यावर करणी केली आहे’ असे सांगत मी ही करणी दूर करतो. तसेच ‘पूजा केल्यानंतर दोन दिवसांत तुमचा भाऊ स्वत:हून भिंत काढून घेईल’,असे सांगितले.


या कामी संशयिताने मुथा यांच्या मुलीला वश करत तिला घरात चोरी करण्यास भाग पाडले. वडिलांनी पूजा अर्धवट केल्याने वडील मृत्यू पावतील अशी भीती घालत पूजेसाठी या मांत्रिकाने अाणखी पैशांची मागणी केली त्यासाठी नातेवाइकाच्या घरी चोरी करण्यास भाग पाडले. पोलिसांत अालेल्या तक्रार अर्जाच्या चौकशीत पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला. सापळा रचून डोंबिवली रेल्वेस्थानकावर पाेलिस पथकाने संशयितास पैसे स्वीकारताना अटक केली. बुधवारी सहायक निरीक्षक सारिका आहिरराव, पंकज पळशीकर, सुनील जगदाळे यांच्यासह अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी या भोंदूबाबाच्या घरी झडती घेतली. घरात चांदीच्या वाट्या, पाच हजार रुपयांची रक्कम आणि तंत्रविद्येची पुस्तके, धागे, दोरे, गंडे, भस्म आदी अघोरी विद्याच्या वस्तू अाढळून आल्या. भोंदूबाबाला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...