आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: आयकरच्या 120 अधिका-यांची 7 कांदे व्यापा-यांवर धाड, 35 टक्के दर घसरले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छापे पडताच लिलाब बंद झाल्याने कांद्याचे 35 टक्के भाव खाली आले आहेत. - Divya Marathi
छापे पडताच लिलाब बंद झाल्याने कांद्याचे 35 टक्के भाव खाली आले आहेत.
नाशिक- कांद्याची संभाव्य दरवाढ टाळण्यासाठी 7 व्यापाऱ्यांच्या 25 ठिकाणांवर आयकर खात्यांच्या 120 जणांच्या टीमने सलग दोन दिवस छापे टाकले. या छाप्याचे परिणाम लागलीच दिसू लागले. कांद्याचे घाऊक बाजारातील दर तब्बल 35 टक्के घसरले आहेत. या छापेमारीमुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. 
 
दरवर्षी सणांचा हंगाम सुरू झाल्यानंतर दिवाळीच्या आसपास कांद्याचे भाव भडकतात. त्यामुळे भविष्यात कृत्रिम टंचाई होऊन कांदा दरवाढ होऊ नये म्हणून आयकर विभागाने गुरुवारी सकाळी सहापासूनच नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकले जात आहेत. या व्यापा-यांची घरे, गोदामे, कार्यालयांसह सर्वत्र तपासणी सुरु आहे. मागील दोन-तीन महिन्यात कांद्याची किती आवक-जावक झाली याची कागदपत्रे व्यापा-यांकडून हस्तंगत केली जात आहेत.
 
या व्यापा-यांच्या एकूण 25 ठिकाणांची तपासणी सुरू असून एकूण साठा, खरेदी, विक्री याची नोंद घेतली जात आहे. अनेक ठिकाणी लिलाव बंद झाल्याने गुरुवारी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दरम्यान, व्यापारी असोसिएशनने शुक्रवार आणि शनिवारी कांदा लिलाव बंद ठेवल्याचे जाहीर केले आहे. सरकारच्या धोरणाविरोधात चर्चा करण्यासाठी व्यापाऱ्यांची शनिवारी विंचूर येथे बैठक होणार आहे.
 
पावसामुळे मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकमधील कांदा खराब झाल्याने नाशिकच्या उन्हाळ कांद्याला मागणी वाढली. त्यामुळे चारशे ते पाचशे रुपये क्विंटल दराने विक्री होणार्या कांद्याचे दर हजार 700 रुपयांपर्यंत गेले. त्यामुळे मुंबई, दिल्ली या मोठ्या शहरांत कांदा 35 ते 40 रुपये किलो दराने विक्री होवू लागला. त्यामुळे केंद्राने भविष्यात किरकोळ बाजारात दरवाढ भडकू नये म्हणून प्रत्येक राज्यातील कांद्याची साठवणूक तपासण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आठवड्यापूर्वीच लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीत केंद्रीय समितीने पाहणी केली होती.
 
कमी दरात शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून साठवून ठेवायचा आणि नंतर कृत्रिम टंचाई निर्माण करून दरवाढ मिळवत आर्थिक लाभ पदरी पाडून घ्यायचा व्यापाऱ्यांचा फंडा आहे. केंद्राच्या समितीने हे हेरूनच आठवड्यापूर्वीच जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांत पाहणी केली. सध्या बाजार समित्यांत कांदा 12 ते 15 रुपये किलोने विक्री होत असला, तरी किरकोळ बाजारात तो 20 ते 30 रुपये किलो दराने विक्री होत आहे.
 
या व्यापाऱ्यांवर टाकले छापे-
 
1) सतीश लुंकड (एस. ताराचंद)(सटाणा). 
2) खंडू देवरे (उमराणे).
3) रतनलाल राका (लासलगाव). 
4) कांतीलाल सुराणा (लासलगाव).
5) रामेश्वर अट्टल (येवला).
6) सोहनलाल मोहनलाल भंडारी (पिंपळगाव).
7) प्रवीण हेडा (चांदवड).
 
व्यापा-यांनी कांद्याची दरवाढ अशी केली (प्रतिक्विंटल)
 
- 27 जुलै : 700 ते 800 रुपये 
- ऑगस्ट : 1400 ते 1500 रुपये 
- ऑगस्ट : 2600 ते 2700 रुपये
बातम्या आणखी आहेत...