आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनमाड - रेल्वे विभागाने एसएमएस सुविधा सुरू केल्यामुळे तिकीट कन्फर्म झाल्याची माहिती एसएमएसद्वारे तत्काळ मिळेल. यासाठी आतापर्यंत प्रवाशांना चौकशी कक्षाच्या रांगेत उभे राहावे लागायचे किंवा 139 क्रमांकावर संपर्क करावा लागायचा. रेल्वे राज्यमंत्री अधीर रंजन चौधरी यांनी सोमवारी ही घोषणा केली. एसएमएस सुविधेसाठी सीआरआयएसने सॉफ्टवेअर तयार केले आहे. सीआरआयएस रेल्वे विभागाशी निगडित विभाग आहे. दररोज प्रवास करणार्या सुमारे 4 लाख प्रवाशांना याचा लाभ मिळेल. प्रतीक्षा यादीतील तिकिटांसंदर्भात आरक्षणासाठी भरलेल्या फॉर्ममध्ये नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवला जाईल.
या वेळी चौधरी म्हणाले की, ‘मागील काही दिवसांपासून आम्ही या सुविधेचे परीक्षण करत होतो. याच पार्श्वभूमीवर आम्ही प्रवाशांना एसएमएस अलर्ट सेवेचा औपचारिक शुभारंभ केला.’ रेल्वे अर्थसंकल्पात यासंबंधीची विशेष तरतूद करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांना कटकटीशिवाय प्रवास करणे सोपे जाईल.
एसएमएसमधील माहिती
प्रवाशांना पाठवल्या जाणार्या संदेशात डबा आणि सीट क्रमांकाची माहिती दिली जाईल. स्टेट्स अलर्ट प्रवास सुरू व्हायच्या तीन तास आधी प्राप्त होईल. तसेच एखाद्याचे तिकीट उच्च श्रेणीत अपग्रेड झाले तर त्याला नवीन डबा आणि सीट क्रमांकाचा संदेश मिळेल. प्रतीक्षा यादीतून आरएसीमध्ये पोहोचल्यानंतर पहिला संदेश, तर तिकीट निश्चित झाल्यानंतर दुसरा संदेश पाठवला जाईल. डबा आणि सीट क्रमांक जारी झाल्यानंतर तिसरा संदेश पाठवला जाईल. त्यामुळे आता आरक्षणाचे तिकीट निश्चित झाले किंवा नाही हे पाहण्यासाठी आरक्षण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यास मदत होईल. शिवाय संकेतस्थळावरील दबावही मोठय़ा प्रमाणात घटेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.