नाशिक- नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आणि तिबेटियन मार्केटशेजारील रेल्वे आरक्षण केंद्रावर दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना वेटिंगवर किंवा उभ्याने प्रवास करावा लागतो. उन्हाळी सुट्यांचेही आतापासूनच नियोजन करण्यात येत असून, त्याला रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांची आतून साथ असल्याचे चित्र आहे.
मार्च महिना लागल्यावर परीक्षांचा हंगाम सुरु होतो. त्यानंतर मुलांना उन्हाळी सुट्या लागत असल्याने अनेक पालक पर्यटनाला जाण्यासाठी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी अनेकांनी आतापासूनच रेल्वे तिकीट आरक्षणाला सुरुवात केली आहे.
मात्र, नाशिकरोड रेल्वेस्थानक आणि शहरातील तिबेटियन मार्केटशेजारील रेल्वे आरक्षण केंद्रावर दलालांचा सुळसुळाट मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यांना पोलिस आणि रेल्वेच्या काही कर्मचार्यांची अर्थपूर्ण साथ असल्याचे दिसून येत आहे. पुढील स्टेशनवरून जोडगाडी मिळेल का, तिची वेळ किती असेल, अशी चौकशी केल्यावर, चौकशी कक्षात जाऊन विचारपूस करण्याचा सल्ला रेल्वे कर्मचारी देतात. दलालांना मात्र पूर्ण माहिती दिली जात असल्याचा आरोपदेखील प्रवाशांनी केला आहे.
सर्वसामान्य प्रवाशांना एकाच वेळी सहा ते आठ लोकांसाठीच तिकीट दिले जाते. मात्र, दलालांना एकाच वेळी 40 ते 45 प्रवाशांचे आणि वेगवेगळ्या तारखांचे, तसेच वेगवेगळ्या स्थानकांचे तिकीट उपलब्ध करून दिले जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
साटेलोटे थांबवा
दलाल आणि क र्मचार्यांच्या साटेलोट्यावर बंधन आणण्यासाठी आणि दलालांचा वावर कमी करण्यासाठी आरक्षण केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे. संदीप बोराडे, सामाजिक कार्यकर्ते
पोलिसांची भूमिका संशयास्पद
नाशिकरोड रेल्वेस्थानकावर किमान सहा ते सात दलाल कायम फिरतात. त्यांतील काही तरुण सकाळी तत्काळ आरक्षणाच्या वेळी आरक्षण काढतात, तर इतर दलाल दिवसभर आरक्षण केंद्रातच दिसून येतात. तत्काळ आरक्षण सुरू होण्याच्या 10 ते 15 मिनिटे अगोदर रांग लावण्यावरून गोंधळ निर्माण होतो. त्यातच दलाल प्रत्येक रांगेत क्रमांक एकवर येतो आणि सर्वसामान्य प्रवासी तीन तास रांगेत थांबूनही पाठीमागे राहतो. त्यामुळे येथील पोलिसांची भूमिकाही संशयास्पद दिसून येते.
हे चुकीचे आहे
मी रेल्वेबाबत माहिती आणि वेळ विचारली तर चौकशी खिडकीकडे पाठवण्यात आले. माझ्यासमोरच एका दलालाची चौकशी करून त्याला 40 ते 45 आरक्षण तिकिटे देण्यात आली, हे चुकीचे आहे. गिरीश गावित, प्रवासी