आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक/नाशिकरोड- बंगालच्या उपसागरात व आंध्र प्रदेश किनारपट्टीलगतच्या प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यामुळे पुन्हा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. नाशिक शहरात मंगळवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. शहरातील हवामान केंद्रावर 6.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू असल्याने केबल प्रक्षेपणही खंडित झाले.
पावसाच्या मुख्य हंगामातील अंतिम दिवस शिल्लक राहिले आहे. मात्र, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तसेच उकाड्यात वाढ झाल्याने पुन्हा पावसाचे संकेत हवामान खात्याने दिले होते. मंगळवारी शहरातील नाशिकरोड, सिडको, सातपूर, पंचवटी, मेरी, म्हसरूळ, गंगापूररोड, कॉलेजरोड, इंदिरानगर येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. या वेळी वार्याचा वेग नसल्याने संततधार सुरू होती. या पावसामुळे वाहनचालकांना समोरचेही दिसत नसल्याने वाहने थांबविण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय उरला नव्हता. नाशिकरोड परिसरात जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. प्रत्येक रस्त्यावरुन पाणी वाहत होते. चौकाचौकात पाणी साचून तलाव तयार झाला होता. दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सायंकाळी 8 वाजेपर्यंत सुरू होता.
बिटको, शिवाजी, देवी चौक, उड्डाणपुलावर पाणी साचून वाहत होते. अनेक गणेश मंडळांनी सामाजिक संदेश देण्यासाठी देखावे सादर केले होते. मात्र, सायंकाळीच पाऊस पडला तर खर्च वाया जाणार म्हणून कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पाऊस फुल, वीजपुरवठा गुल
मंगळवारी सायंकाळी 6.30पासून सिडको परिसरातील विविध भागांमधील तसेच नाशिकरोडमधील वीज गायब झाली होती. तब्बल तीन तासांहून अधिक काळ वीज गेल्याने नागरिकांना ऐन गणेशोत्सवात अंधाराचे साम्राज्य सहन करावे लागले. त्रिमूर्ती चौक , दुर्गानगर, कामटवाडे, इंद्रनगरी, कोकण भवन, पवननगर व अभियंतानगर परिसरातील तब्बल एक लाख नागरिकांना मंगळवारची सायंकाळ व रात्र अंधारात काढावी लागल्याने त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
मंडळांची धावपळ
अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे छोट्या गणेश मंडळांची धावपळ उडाली. मंडपात पाणी शिरत असल्याने त्यावर ताडपत्री, प्लास्टिक टाकण्यासाठी पळापळ सुरू होती. उशीर झाल्याने अनेक मंडळांचे मंडप ओले होऊन देखाव्याला झळ पोहोचली.
नाशिकरोड दोन तास अंधारात
नाशिकरोड परिसरात पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच पंचक फीडरवरील पिन्टो कॉलनीतील जंपिंग तुटल्याने शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. एकीकडे जोरदार पाऊस तर दुसरीकडे पुरवठा खंडित झाल्याने काळोख झाला होता. सायंकाळची वेळ असल्याने ग्राहकांकडून वारंवार महावितरणच्या कार्यालयात तक्रार केली जात होती. अखेर भरपावसात कर्मचार्यांनी पर्शिम घेऊन पुरवठा पूर्ववत केला; मात्र तरीही जवळपास शहर दोन तास अंधारात होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.