आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोहिणी नक्षत्राच्या पावसाने सुखावले नाशिककर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरासह परिसरात शनिवारी (दि. ६) रोहिणी नक्षत्रातील पावसाने दमदार हजेरी लावली. सिडकाे, इंदिरानगर भागात सुमारे अडीच तास पाऊस झाला. उकाड्याने त्रासलेल्या नाशिककरांना त्यामुळे माेठाच दिलासा मिळाला. मान्सूनने काहीसा उशीर केला असला तरी मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येस झालेल्या पावसाच्या सरींमुळे गारवा निर्माण झाल्याने शहरवासीय सुखावले. मेरी येथील हवामान केंद्रात एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तपमान किमान २५.५, तर कमाल ३५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने किमान तपमान २५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. शनिवारीही सकाळपासूनच आकाश दाटून आले हाेते. पंचवटी, गंगापूररोड, नाशिकरोड, राणेनगर, सिडको, अंबड, सातपूर, मेरी, द्वारका, कॉलेजरोड परिसरात दुपारी चारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. अंबड, विल्होळी, पिंपळगाव, पाथर्डी, दाढेगाव, चुंचाळे या भागातील शेतकरीराजा पावसाने सुखावला आहे.
..अन‌् सुरू झाला विजेचा लपंडाव
पाऊससुरू होताच नेहमीप्रमाणे विजेचा लपंडाव सुरू झाला. वादळी पावसामुळे झाडांच्या फांद्या वीजतारांवर पडत असल्याने सुरक्षितता म्हणून वीजप्रवाह बंद करण्यात आला. मात्र, पाऊस आेसरल्यानंतरही सिडकोतील अनेक भागांत वीजपुरवठा खंडितच होता. रात्री तो पुन्हा सुरू झाला.
शहरासह परिसरात शनिवारी दुपारनंतर पाऊस अचानक कोसळायला लागल्याने चिमुकलीने या पावसाचा असा आनंद लुटला. तर शेजारील छायाचित्रातील या मंडळींनी त्यापासून संरक्षण करण्यासाठी प्लास्टिकच्या कागदाचा असा हुशारीने वापर केला, मात्र या युक्तीबद्दल त्यांचे कौतुक करावे की ऐन पावसात एकाच दुचाकीवरून फिरण्याच्या वृथा धाडसाबद्दल चिंता?