आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३१ ठेकेदार गायबच; पालिकेने जेसीबी लावून काढले पाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - दोन आठवडे पावसाने दडी मारल्यानंतर गुरुवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. गुरुवारी (दि. १३) रात्री १२ वाजेपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर शुक्रवारी (दि. १४) सायंकाळपर्यंत तडाखेबंद पाऊस झाला. या दरम्यान ७१.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, शहरात जागोजागी रस्त्यावर पाणी साचल्याने शहरवासीयांची त्रेधातिरपीट उडाली. गोदावरी, नासर्डी, दारणा आणि वालदेवी नद्या दुथडी वाहत होत्या. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच या नद्यांना पूर अाला. 
 
समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने दोन आठवडे पावसाने दडी मारली होती. मात्र, चार दिवसांपासून पावसाला अनुकूल वातावरण तयार झाल्याने आठवडाभर उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. शहरात गुरुवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र, मध्यरात्रीपासून तडाखेबंद पावसाला सुरुवात झाल्याने शरणपूररोड, सिडको, सातपूर, नाशिकरोड, जेलरोड, उपनगर, देवळाली कॅम्प, पाथर्डी फाटा, इंदिरानगर, राणेनगर या परिसरात रस्त्यावर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना पाण्यातून मार्ग काढावा लागत होता. तर सराफ बाजारात पुन्हा पाणी साचल्याने व्यावसायिकांची त्रेधातिरपीट उडाली. त्यामुळे नागरिकांमध्ये महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप दिसून येत होता.
पंचवटीमध्ये पावसामुळे एक वृक्ष उन्मळून पडला, तर तिडके काॅलनीमध्ये एक वृक्ष उन्मळून पडला. दुपारी चारनंतर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शांत झालेल्या रस्त्यावर पुन्हा वर्दळ दिसून येत होती. 

१९ जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज : पश्चिम राजस्थान ते पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य महाराष्ट्रासह गुजरातमध्ये पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे १९ जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 
उंटवाडीपरिसरातील पूल काही वेळासाठी बंद : पावसामुळेउंटवाडी परिसरातील पूल वाहतुकीसाठी काही वेळेसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, दुपारनंतर वाहतुकीसाठी पूल सुरू करण्यात अाला. 

रस्त्यांना तळ्याचे स्वरूप, : शहरातील उपनगर, द्वारका, पंचवटी, सिडको, इंदिरानगर भागात ठिकठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. परिणामी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. 

सोमेश्वर परिसरात सेल्फी काढण्यासाठी गर्दी, : शहरातीलप्रसिद्ध सोमेश्वर धबधबवाहत होता. यामुळे या ठिकाणी धबधबा बघण्यासाठी, फोटो काढण्यासाठी तरुणाईसह नागरिकांनी गर्दी केली होती. गंगापूररोड, आनंदवली भागात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. 
 
बांधकाम विभाग झाेपेत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झाल्यामुळे संततधार पावसामुळे शुक्रवारी शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबल्यानंतर प्रभागनिहाय पावसाळी पाण्याचा निचरा करणारे ठेकेदारच दिसल्यामुळे नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, महापालिकेचा बांधकाम विभाग मात्र या सर्वात तत्परतेने अक्षरश: जेसीबी लावून काम करताना दिसला. त्यामुळे जे काम पालिकेमार्फत फुकट करणे शक्य हाेते त्यासाठी ३१ ठेकेदार नेमून पाेसण्याच्या उद्याेगामागचा संशय वाढला अाहे. 

१४ जून राेजी दाेन तासात ९२ मि. मी पाऊस झाल्याचे कारण देत महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरात पाणी तुंबण्याच्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. वास्तविक, पावसाळापूर्व सफाईसाठी पालिकेने ३१ ठेकेदार नेमले असताना त्यांनी काय सफाई केली याचे पुरावे बांधकाम विभागाला देता अाले नाही. या मुद्यावर गंभीर चर्चा झाल्यानंतर बांधकाम विभागाचे शहर अभियंता यू. बी. पवार यांची चाैकशीही महापालिका अायुक्तांमार्फत सुरू झाली अाहे. इतके प्रकरण गंभीर झाल्यानंतरही पाण्याचा निचरा करण्याबाबत बांधकाम विभाग उद्युक्त झाला नसल्याची बाब शुक्रवारी अधाेरेखित झाली. गुरुवारी रात्रीपासून पावसाने धरलेला जाेर, १२ जुलैनंतर पाऊस वेग धरण्याबाबत व्यक्त झालेला अंदाज या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाने अाधीच नियाेजन करून पावसाळी गटारीचे चेंबर्स स्वच्छ करून घेणे गरजेचे हाेते. प्रत्यक्षात तसे झाले नसल्याचे शुक्रवारी उघड झाले. परिणामी, शहरातील अनेक ठिकाणी पाणी तुंबले. विशेष म्हणजे, प्रभागनिहाय पावसाळी गटार तसेच चेंबर्स स्वच्छतेसाठी ठेकेदार नियुक्त केल्याचा दावा पवार यांनी केला हाेता. मात्र, असे ठेकेदार फिल्डवर दिसलेच नसल्याचे नगरसेवकांनी महापालिकेत सांगितले. पालिकेचा बांधकाम विभाग स्वत:ची यंत्रसामग्री घेऊन मात्र तत्पर असल्याचा दिसला. थाेडक्यात, महापालिका जे काम फुकटपणे स्वयंत्रणेतून करू शकत हाेते वा करीत अाहे. त्याच कामासाठी ठेकेदार नेमून स्वच्छता काेठे केली? असा प्रश्न अाता चाैकशीच्या केंद्रस्थानी असणार अाहे. 

पूरपरिस्थिती बाबत सतर्कतेचे महापाैरांचे अादेश : गंगापूरधरण आळंदी धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात तसेच खालील भागात पावसाचा जाेर बघून गाेदावरीला पूर येण्याची शक्यता लक्षात घेत महापाैर रंजना भानसी उपमहापाैर प्रथमेश गिते यांनी बैठक घेऊन पूरपरिस्थितीबाबत सतर्क राहण्याचे अादेश महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे पात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, या परिसरात ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्याच्याही सूचना केल्या. पावसामुळे बाधित कुटुंबांना पालिका शाळांमध्ये तसेच समाजमंदिरांमध्ये हलविण्याचेही नियोजन करावे अशा सूचना दिल्या. 

महापालिकेवर पुन्हा शिवसेनेचे बाण : १४जून राेजी पावसाळी गटार तुंबल्यामुळे शहरात पाणी पाणी झाल्याचे ताजे उदाहरण या प्रकरणावरून चाैकशी सुरू असतानाही पालिकेचा बांधकाम अापत्कालीन विभाग बेफिकिर असल्याचा अाराेप विराेधी पक्षनेते अजय बाेरस्ते यांनी केले. शिवसेनेेने यापूर्वीच पावसाळी गटार याेजनेतील भ्रष्टाचारावरून अाक्रमक पवित्रा घेतला हाेता. मात्र, त्यानंतरही प्रशासन सत्ताधारी ढिम्म असल्याचे चित्र दिसल्याचे बाेरस्ते यांनी सांगितले. पावसामुळे शहरात नुकत्याच झालेल्या रस्त्यांची अनेक ठिकाणी चाळण झाली अाहे. पावसाळी गटारी अजूनही तुंबल्या अाहेत. गाेदावरीला पूर अाल्यानंतर येथे नागरिकांना सूचना देणे वा अापत्कालीन परिस्थिती हाताळणारी यंत्रणाच दिसली नसल्याची खंतही व्यक्त केली. 

{ महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमाेर शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा पाणी साचले हाेते. 
{ त्र्यंबकराेडवरील जलतरण तलावाजवळ पाण्याचे तळे साचले हाेते. 
{ मल्हार खाण वसाहतीसमाेर स्व. फाळके यांच्या जुन्या निवासस्थानालगत रस्ता पाण्याखाली हाेता. 
{ पंचवटी पाेलिस ठाण्यासमाेर पाणी साचले हाेते. 
{ अशाेकस्तंभ परिसरातील चेंबर्समधून पाणी बाहेर 
{ मेरीचे सांडपाणी नेणारी गटार लामखेडे मळा चाैफुलीजवळ रस्त्यावरून वाहत हाेती. 
{ मायकाे सर्कल ते तिडके काॅलनीलगतच्या रस्त्यात जेसीबीद्वारे पाण्याला वाट माेकळी करून दिली. 

अायुक्तांनी केली ठिकठिकाणी पाहणी 
पावसाचे राैद्ररूप लक्षात घेत पालिका अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी शहरात ठिकठिकाणी फिरून पाहणी केली. त्यांच्याकडेही ठेकेदाराकडून पावसाळी गटार स्वच्छतेचे काम हाेत नसल्याच्या नगरसेवकांनी तक्रारी केल्या. यासंदर्भात त्यांनी शहर अभियंत्यांकडून अहवाल मागवल्याचे सांगितले. 
 
{ पंचवटीतील मखमलाबादरोडवरील मोरे मळा येथे नाल्यात लहान मुलगा वाहून गेल्याची भीती. अग्निशामक दलाच्या जवानांकडून शोधकार्य सुरू आहे. 
{ पावसामुळे शहराच्या काही भागात वीजपुरवठा खंडित. 
{ पंचवटीत कडूनिंबाच्या झाडाची फांदी पडल्याने दोन कार आणि दुचाकीचे नुकसान झाले. 
{ सिडकोतील घरांमध्ये नाल्यांचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल. { पावसाच्या पाण्यामुळे सातपूर परिसरात ठिकठिकाणी साचले तळे 
{ उंटवाडी परिसरातील पूल वाहतुकीसाठी काही वेळासाठी बंदी. 
{ रस्त्यांना तळ्याचे स्वरूप, वाहनधारकांच्या अडचणीत वाढ 
{ होळकर पुलावर बघ्यांची गर्दी 
{ आनंदवली भागात पाणीच पाणी 

येथे संपर्क करा 
शहरातीलविविध भागात पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणी सोडविण्यासाठी महानगरपालिका यंत्रणा सतर्क सज्ज आहे. तसेच कुठलीही वित्तहानी अथवा जीवितहानी होऊ नये या दृष्टीने मनपाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. या परिस्थितीत नाशिक महानगरपालिकेमार्फत आपत्कालीन कक्ष २४ तास सुरू असून नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत ०२५३-२५७१८७२, ०२५३-२३१७५०५, ०२५३-२२२२४१३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे अावाहन केले. 

 
बातम्या आणखी आहेत...