आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१०० मिनिटांमध्ये ४१ मि. मी. पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दोन-तीन दिवसांपासून काहीशी विश्राती घेतलेल्या वरुणराजाने शुक्रवारी दमदार हजेरी लावली. सुमारे १०० मिनिटांत तब्बल ४१ मिलमिटर पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली असून, पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील सहा तासांत अंदाज घेऊन गंगापूर धरणातून प्रथम तीन हजार क्यूसेक पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे.
तीन दिवसांपासून काही प्रमाणात पाऊस थंडावला होता. गुरुवारी दुपारी पावसाच्या हलक्याशा सरींनी काही प्रमाणात दिलासा दिला. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाचे वातावरण जाणवत होते. दुपारी साधारणपणे २.५० वाजेपासून ४.३० वाजेपर्यंत म्हणजे अवघ्या १०० मिनिटांच्या कालावधीत शहर परिसरात ४१ मिलमिटर पावसाची नोंद झाली. धो-धो पडलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शाळा-महाविद्यालये सुटण्याची ही वेळ असल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ झाली. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या लोटांचा दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागला.
यंत्रणा सज्ज :
आधीच गोदावरी खळाळून वाहत असताना, शुक्रवारच्या पावसामुळे धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला. महापालिकेनेही लाऊडस्पीकरद्वारे दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेचा अग्निशमन विभागही सज्ज असून, जीवरक्षकांची टीमही बोटीसह सज्ज ठेवण्यात आली आहे.
भुयारी गटारींचे चेंबर्स तुंबले
पावसाळ्याच्या उत्तरार्धातही शहरातील भुयारी गटारींची स्वच्छता व्यवस्थित होत नसल्यामुळे जेमतेम दीड तासाच्या पावसात नाशिकचे रस्ते पाण्याखाली गेले. खड्ड्यांतील माती वाहून गेल्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला.
कॉलेजरोड, गंगापूररोड, महात्मानगर, तिडके कॉलनी, मायको सर्कल, चांडक सर्कल, सीबीएस, शालमिार, रविवार कारंजा तसेच शहराच्या इतर उपनगरांतील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. पाण्याचा निचरा होण्यासाठी तयार केलेल्या भुयारी गटार योजनेचे बारा वाजल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. चेंबर्सची छिद्रे साफ न केल्यामुळे पाणी तुंबून काही भागात घरातही घुसले. त्यामुळे पावसाळापूर्व कामांसाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने केलेल्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अनेक ठिकाणी लोकांना स्वत:च चेंबर्सची सफाई करावी लागली. दुसरीकडे खड्ड्यांतील माती वाहून रस्त्यावर पसरली. त्यामुळे खड्ड्यांबरोबरच मातीवर वाहने घसरण्याचे प्रकारही घडले.
मघा नक्षत्रामुळे धो-धो
सध्या मघा नक्षत्र सुरू आहे. त्याचे वाहन कोल्हा असून, त्यात एकतर विजांच्या कडकडाटासह खूप पाऊस पडतोच, अन्यथा थेंबही पडत नाही. त्यानुसार, शुक्रवारी विजांसह मुसळधार पाऊस झाला आहे.
प्रसादशास्त्री कुलकर्णी, विद्यावाचस्पती

गंगापूर लाभक्षेत्रात संततधार

गंगापूर धरण लाभक्षेत्रात पाऊस सतत पडत असून, हे प्रमाण असेच राहिल्यास तीन हजार क्यूसेक पाणी सोडण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.