आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेमोसमी बरसल्यामुळे वाढला थंडीचा कडाका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- थंडीच्या मुख्य हंगामातही सातत्याने ढगाळ हवामानामुळे शहरात मंगळवारी सकाळी 7 वाजता बेमोसमी पाऊस सुरू झाला. दिवसभर रिमझिम सुरू होती. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. शहरात सोमवारी तपमान 11.2 होते, मंगळवारी त्यात थेट 7 अंशांनी वाढ होऊन ते 17.4 अंश सेल्सिअस असे हवामान केंद्रात नोंदले गेले. रात्रीही दाट धुके पडले होते.


शहरात नाशिकरोड, पेठ रोड, इंदिरानगर, सिडको, पंचवटी, राणेनगर, नवीन नाशिक, कॉलेज रोड, महात्मानगर, मेरी आदी भागात सकाळी 7 वाजता बेमोसमी पावसास सुरुवात झाली. पाऊस पडण्यापूर्वी वातावरणात उकाडा जाणवत होता. तर, पाऊस पडल्यानंतर काही वेळाने वातावरणात गारवा जाणवत असल्याने नागरिकांना स्वेटर घालावे की रेनकोट घालावा, हा प्रश्न पडला होता. त्यानंतर दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता.

त्र्यंबकेश्वर रस्त्याचे सध्या काम सुरू असून, या ठिकाणी रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला आहे. पाऊस पडल्याने या रस्त्यावर चिखल तयार झाला. यामुळे तळेगाव, अंजनेरी फाटा, महिरावणी, त्र्यंबक विद्यामंदिर येथे ये-जा करणारी दुचाकी वाहने घसरून पडत असल्याने अनेक दुचाकीस्वार जखमी झाले होते.

हलक्या स्वरूपाचा पाऊस शक्य
या आठवड्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तपमान हे 30 ते 31 आणि किमान 11 ते 18 अंश सेल्सिअस अंशांच्या दरम्यान राहणार आहे. - व्ही. एस. पाटील, तांदूळ संशोधन केंद्र, इगतपुरी