नागरिकांची त्रेधातिरपीट
शहरात गुरुवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास गंगापूररोड, पंचवटी, कॉलेजरोड, महात्मानगर, मुंबईनाका, सिडको, सातपूर या परिसरात गारांसह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती. गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.
विजेचाही लपंडाव
पाऊस पडण्यापूर्वी सोसाट्याचा वारा सुरू झाल्याने शहरातील तिडके कॉलनी, गंगापूररोड, कॉलेजरोड, राणेनगर, सिडको, सातपूर, पंचवटी येथील काही भागात काही काळ विजेचा लपंडाव सुरू होता. ऐन परीक्षेचा काळ सुरू असल्याने विद्यार्थ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
व्यावसायिकांची धावपळ
गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नसल्याने व्यावसायिक बिनधास्त होते. मात्र, सायंकाळी गर्दीच्या वेळेसच पाऊस सुरू झाल्याने मालाची आवरासावर करण्यासाठी दुकानदारांची धावपळ सुरू होती, तर नागरिकही पावसापासून बचाव करण्यासाठी आडोसा शोधत होते.