नाशिक - शहरातील सर्व पावसाचे पाणी द्वारका येथे संकलित करून तपाेवनातील मलजलशुद्धीकरण केंद्राला जाेडणे अपेक्षित हाेते. मात्र, ऐनवेळी नकाशांमध्ये बदल करून सारडा सर्कलमार्गे भद्रकाली टॅक्सी स्टॅण्ड येथे संकलन केंद्र केल्याने सराफ बाजारात पाणी तुंबून काेट्यवधीचे नुकसान झाल्याचा दावा पश्चिम प्रभाग समिती सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. दरम्यान, महासभेत भुयारी गटार याेजनेतील भ्रष्टाचाराबाबत एकत्रित लक्षवेधी दाखल केली जाणार असून, पावसावर प्लास्टिक पिशव्यांवर खापर फाेडणाऱ्या प्रशासनाचे पितळ उघडे पडणार अाहे.
जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत २००७ ते २०१० या कालावधीत तयार केलेल्या भुयारी गटार याेजना अनेक वर्षांपासून वादात असून, दरवर्षी पावसाची पाणी तुंबण्याची समस्या भेडसावत अाहे. नानाविध कारणे सांगून अंग झटकणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका नवीन राहिलेली नाही. दरम्यान, या सर्व परिस्थितीला चुकीचे नियाेजन कारणीभूत ठरल्याचे नगरसेवकांचे म्हणणे अाहे. त्यावर पश्चिम प्रभाग समितीच्या बैठकीत काँग्रेस गटनेते शाहू खैरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी प्रकाश टाकत एकत्रितरित्या हल्लाबाेल केला.
प्रामुख्याने कॅनडा कार्नर, गंगापूररोड, कॉलेजरोड या भागापासून घराघरांमधून बाहेर पडणारे सांडपाणी द्वारका येथे एकत्र केले जाणार हाेते. पुढे हेच पाणी जलवाहिनीद्वारे अमरधाम मार्गावरून तपोवन एसटीपीला जोडण्याचे नियोजन होते. त्यावेळी महासभेत याच पद्धतीने भुयारी गटार योजनेच्या नकाशांना मंजुरी दिली गेली. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर मात्र, खडक चढ असल्याचे कारण पुढे करत वेलकॉस सल्लागार कंपनीने भद्रकाली टॅक्सी स्टॅण्डच्या जागेवर कलेक्शन सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. येथील पाणी पुढे सरस्वती नाल्याला जोडण्यात आले. या सर्वाचा परिणाम म्हणून शहरातील सर्व नाल्यांचे पाणी येथे जमा झाले अतिरिक्त जमा झालेले पाणी भद्रकालीतील उतारावरून बाहेर पडून सराफबाजार, दहीपुलाकडे गेले.
यंदा पहिल्याच पावसाने दाणादाण उडाली असून शहरातील विविध भागातील घरांमध्ये पाणी घुसले. गाेदावरीलगतच्या सर्व परिसर, सराफ बाजार, फुलबाजार, जुने नाशिकमधील सखल भाग जलमय झाला हाेता.
बुधवारी पावसाच्या पाण्यामुळे शहरात अताेनात नुकसान झाल्यानंतर बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याएेवजी महापौर रंजना भानसी यांच्याकडून पाठराखण करण्यात अाली हाेती. त्याचे महासभेत पडसाद उमटण्याची शक्यता असून शिवसेनेसह विराेधकांकडून जाब विचारला जाणार अाहे. दरम्यान, बैठकीत पूरपरिस्थिती निवारणासाठी अधिकारी फिरकले नाही, भुयारी गटार योजनेचे काम चुकीच्या पद्धतीने झाल्याने नागरिकांना त्रास झाला. भद्रकाली पंपिंग स्टेशनच्या कामात गैरव्यवहार झाला असून त्याची चाैकशी करावी, अशी मागणी अजय बोरस्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार यांच्यासह योगेश हिरे, समीर कांबळे, वत्सला खैरे स्वाती भामरे यांनी केली.