नाशिक - महापालिकेची अर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे लोकांवर उगाच खर्चाचा बोजा टाकण्याऐवजी वर्षभरात नाशिकमध्ये चार मोठे मात्र जुनेच प्रकल्प पुन्हा पूर्ण करण्याचे काम खासगी कंपन्यांच्या मदतीने पूर्ण होईल, असा आशावाद व्यक्त करत राज ठाकरे यांनी नाशिककरांना पुन्हा एकदा नवनिर्माणाचे स्वप्न दाखवले. छोट्या कंत्राटदारांची जाळी पोसण्याच्या नादात रस्त्यांचे वाटोळे झाले असून मुंबई, पुण्याप्रमाणे डिफर पेमेंटमधून माेठ्या कंपन्यांच्या मदतीने रस्ते निर्मितीचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी शनिवारी स्पष्ट केले.
नाशिक दौर्यावर असलेल्या राज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आठ महिन्यांपासून आयुक्त नसल्यामुळे नवनिर्माणाच्या कामांना ब्रेक लागला. शिवाजी उद्यानाच्या विकासासाठी
आनंद महिंद्रा तयार होते. त्यांना विचारले की काम का सुरू नाही? यावर ते म्हणाले, माझी यंत्रणा सज्ज आहे. परंतु पालिकेबरोबर करारनामा नाही. करारनामा करण्यासाठी आयुक्त नसल्यामुळे खोळंबले. मुळात महापालिकेकडे पैसे नसल्यामुळे सीएसआर (व्यावसायिक सामाजिक दायित्व उपक्रम) अॅक्टिव्हिटीतून चार मोठे प्रकल्प पूर्ण केले जातील. त्यात गाेदापार्क, पांडवलेणी येथील बॉटनिकल गार्डन, पेलिकन पार्क, फाळके स्मारक यांचा समावेश असेल.