आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Assembly Rally At Nashik,latest News In Divya Marathi

शहरात उत्कंठा, सिंहस्थ निधीवरून राज यांची आज धडाडणार तोफ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिकच्या बालेकिल्ल्यात मनसेला आलेले अपयश झाकण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडून शनिवारी (दि. 11) शहरातील तिन्ही मतदारसंघांत होणा-या जाहीर सभेत प्रामुख्याने सिंहस्थ निधीच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी तर, महापालिका आयुक्तांची नेमणूक रोखल्याप्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात जोरदार टीका होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने मदत केल्यामुळे भाजप काँग्रेसच टीकेचे लक्ष्य असेल, असे मनसेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
महापालिकेची सत्ता मनसेकडे असूनदेखील गेल्या अडीच वर्षांत या पक्षाला शहरात भरीव कामगिरी करता आलेली नाही. नवनिर्माण तर दूर, साधी मूलभूत नागरी सुविधांची कामेही पूर्ण करता आलेली नाहीत. दुसरीकडे महत्त्वाची पदे मिळविण्याच्या नादात मनसे भाजप यांच्यामध्ये वाद झाले. त्याचा परिणाम म्हणून स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसे भाजप यांच्यातच लढाई झाली. पुढे महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला मदत करण्याची नीती आखून मनसेला जोरदार धक्का दिला. मनसेने ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेऊन सत्ता राखली.
या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्याकडून सत्ता मिळविण्यासाठी मतदारांना कशी भावनिक साद घातली जाते, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. प्रामुख्याने राज यांच्या आजवरच्या सभेत भाजपच लक्ष्य राहिले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेत भाजपकडून कसे असहकार्य झाले, यावर राज यांच्याकडून तोफ डागली जाण्याची शक्यता आहे.
सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असताना केंद्र सरकारकडून दोन हजार 500 कोटींचे पॅकेजही अद्याप पदरी पडलेले नाही. मध्यंतरी साधु-महंतांनी महापौरांची भेट घेऊन निधी कधी मिळणार, अशी विचारणा केली होती. दरम्यान, नाशकात येऊनदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्याबाबत चुप्पी साधल्यामुळे राज या मुद्यावरून भाजपचा हिंदुत्वाचा नारा बेगडी असल्याची टीका करण्याची शक्यता आहे. याबरोबरच महापालिकेतील कामांच्या अपयशाचे खापर काँग्रेसवर फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. खासकरून महापालिकेचे आयुक्तपद गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असल्यामुळे महत्त्वाची कामे कशी खोळंबली यावर राज प्रहार करतील, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांची नेमणूक केल्याने सिंहस्थाच्या कामांसह अन्य महत्त्वाची नागरी विकासकामे करता आली नाहीत. तसेच मनसेच्या नगरसेवकांच्या फाइल्स अडकल्यामुळेही नवनिर्माणाला ब्रेक लागला याचे स्पष्टीकरणही ते देऊ शकतात.

पुन्हा लक्ष नाशिककडेच...
राजयांची पहिली सभा नाशिक पश्चिम मतदारसंघातील संभाजी स्टेडियम येथे होणार असून, त्यानंतर दुसरी सभा नाशिक मध्य मतदारसंघात शिवसत्य मित्रमंडळाच्या दादोजी कोंडदेवनगर येथील मैदानावर होईल. त्यानंतर नाशिकरोडला नाशिक पूर्व मतदारसंघासाठी सभा होणार आहेत. शहरातील तीन मतदारसंघांव्यतिरिक्त जिल्ह्यातील सहा जागा मनसे लढवत असून, येथे एकही सभा दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राष्ट्रवादीसह भुजबळ दूर
नाशिकच्याबहुतांश मतदारसंघांत मनसेची लढत ही शिवसेना भाजप उमेदवारांविरोधातच आहे. त्यामुळे या दोन पक्षांविरोधात ते आक्रमक होतील. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची मदत घेतल्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात ते फार बोलतील, असे दिसत नाही. दुसरीकडे, येवल्यातही मनसेचा उमेदवार नसल्याने राज यांची भुजबळांविरोधातील तलवार म्यान असेल. नांदगाव मतदारसंघात मनसेचा उमेदवार आहे. मात्र, राज यांची सभा मालेगाव बाह्य मतदारसंघात होण्याची शक्यता असल्यामुळे पंकज भुजबळ यांच्याशीही सामना होणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.