आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Chhagan Bhujbal News In Divya Marathi

घरोब्यामुळे राज ठाकरे -छगन भुजबळ शब्दद्वंद थांबणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - निवडणूक आली की हमखास ठरलेल्या राज ठाकरे छगन भुजबळ यांच्यातील शाब्दिक लढाईला आता नाशिककर मुकणार का, असा प्रश्न महापालिकेतील मनसे-राष्ट्रवादीच्या नवीन घरोब्यामुळे निर्माण झाला आहे. यानिमित्ताने उभय पक्षांचा कारभार नेमका कसा चालतो, याची होणारी पोलखोल थांबेल, अशीही खंत व्यक्त केली जात आहे.

महापालिका लोकसभा निवडणुकीत भुजबळांविरोधी अजेंडा राबवून पक्षाचा प्रभाव वाढवणारे राज ठाकरे हे आता कोणत्या मुद्द्यावर नाशिककरांना प्रभावित करतात याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. महापौरपद राखण्यासाठी राज यांनी राष्ट्रवादीची मदत घेतल्यानंतर आता मनसेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. खुद्द राज यांच्या खेळीमुळे मनसेचे विद्यमान पदाधिकारी इच्छुकही धास्तावले आहेत.

भुजबळ यांच्या विरोधात बोलून मते मिळवण्याचा फंडा आता यानिमित्ताने बंद होणार आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांसमोर मनसेची भूमिका काय असेल, याविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. राज भुजबळ यांच्या आरोप-प्रत्यारोपातून अनेक गैरप्रकारांचे किस्से बाहेर पडत होते. आता आघाडीमुळे उभयतांनी तलवारी म्यान केल्यामुळे जाहीर सभेत नेमके कोणते मुद्दे गाजतात, याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आहे. दरम्यान यापूर्वी अनेक जाहीर सभांमध्ये राज आणि भुजबळ यांनी एकमेंकांवर टीका करण्याची संधी कधीही सोडली नाही. त्यामुळे आता प्रचार सभांत दोन्ही नेते काय बोलतात याकडे नाशिकसह राज्याचे लक्ष लागले आहे.