आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Dream Project Goda Park Develop Reliance Nashik

बहुचर्चित गोदापार्कचे काम रिलायन्स उद्योगसमूहाकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गोदापार्कचे अपूर्ण काम आता महापालिकेने रिलायन्स उद्योगसमूहाकडे सोपविण्याचा निर्णय गुरुवारी महासभेत घेतला. या निर्णयाला ‘माकप’वगळता विरोधी गटातील सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला. प्रकल्पासाठी रिलायन्सकडे जागा हस्तांतरित करू नये, तसेच प्रकल्पाची सविस्तर माहिती दिल्याशिवाय अंतिम करारनामा केला जाऊ नये, अशी भूमिका विरोधी पक्षांनी मांडत या गोदापार्कचा मार्ग मोकळा करून दिला.

महापौर अँड. यतिन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली महासभा झाली. सभा सुरू होण्यापूर्वीच जादा विषयात समावेश केलेल्या गोदापार्कच्या विषयाची चर्चा सभागृहात सुरू होती. मनसेचे गटनेता अशोक सातभाई यांनी या प्रकल्पाविषयी सभागृहात माहिती देत प्रकल्पाच्या बदल्यात कंपनीला कोणताही मोबदला न देता रिलायन्स फाउंडेशन हा प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले. या विषयाचा समावेश जादा विषयात केल्याने त्याबाबत शंका उपस्थित करत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रकल्पाबाबत संपूर्ण माहितीचे सादरीकरण केल्यानंतरच अंतिम मंजुरी देऊन करारनामा करण्याची भूमिका मांडली. प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या डॉकेटमध्ये रिलायन्सला जागा हस्तांतरित करण्याचा उल्लेख आल्याने त्यासही सदस्यांनी हरकत घेतली. त्यावर आयुक्त संजय खंदारे यांनी जागेवर पूर्णपणे महापालिकेचा हक्क राहणार असून, केवळ विकासकामे करण्यासाठी त्यांना अधिकार असतील, असे स्पष्ट केले. चर्चेत सुदाम कोंबडे, डॉ. विशाल घोलप, लक्ष्मण जायभावे, अँड. तानाजी जायभावे, यशवंत निकुळे, डॉ. राहुल आहेर, प्रकाश लोंढे, आकाश छाजेड, गटनेता अजय बोरस्ते, दिनकर पाटील, अँड. शिवाजी सहाणे, रंजना पवार, डी. जी. सूर्यवंशी आदींनी सहभाग घेतला.

ना विकास क्षेत्रावर विकास
गोदावरीच्या दोन्ही बाजूचे क्षेत्र ना विकास क्षेत्र आहे. तसेच 100 मीटरचा परिसर हा ब्ल्यू लाइनमध्ये येत असल्याने त्या जागी बांधकाम कसे करणार, असा प्रश्न विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, अपक्ष गटनेता गुरुमित बग्गा यांनी उपस्थित केला. पूररेषेत बांधकाम करणार असाल तर बांधकाम पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या बांधकामांनाही परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. गोदापात्रात सोडण्यात आलेल्या ड्रेनेज प्रथम बंद करून त्यानंतरच प्रकल्पाला परवानगी द्यावी, अशी सूचनाही बडगुजर यांनी केली.

दुसर्‍या टप्प्यात मानूरपर्यंत
पहिल्या टप्प्यात होणार्‍या गोदापार्कप्रमाणेच टाळकुटेश्वर मंदिर ते मानूरपर्यंत गोदापार्क प्रकल्प राबविण्याची मागणी सदस्य उध्दव निमसे, संभाजी मोरुस्कर, बाळासाहेब सानप, संजय चव्हाण यांनी केली. ही मागणी करताना त्यांनी प्रशासनाकडून पंचवटीकडील गोदापात्रातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर महापौरांनी दुसर्‍या टप्प्यात मानूरपर्यंत गोदापार्क प्रकल्प राबविण्याचा निर्णय जाहीर केला. प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती पुढील सभेत सादर करण्याची सूचना सभागृहनेता शशिकांत जाधव यांनी केली. विकासाच्या नावाखाली लोकांच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्याचा आरोप गटनेत्या कविता कर्डक यांनी केला.

असा असेल गोदापार्क प्रकल्प
आनंदवल्ली ते अहिल्यादेवी होळकर पुलापर्यंत हा प्रकल्प साकारला जाणार आहे. त्यासाठी प्रथम अर्धा किलोमीटरवर प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविला जाईल. प्रति एक किलोमीटरसाठी रिलायन्स करणार आठ कोटींचा खर्च. गोदावरीच्या दोन्ही बाजूने सुमारे 13 किलोमीटर इतका असेल प्रकल्प. साधारणपणे 100 कोटींचा खर्च प्रकल्पासाठी अपेक्षित आहे. प्रकल्पात रोप-वे, फूट वे-ब्रिज, लेझर शो, योगा व इतर सांस्कृतिक खेळांसाठी केंद्र, बोटिंग क्लब, चौपाटी, खुला रंगमंच, जॉगिंग ट्रॅक इत्यादी बाबींचा समावेश राहणार आहे.