आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे यांच्या अचानक दौर्‍याने महापौर बदलाची ‘चांगली’च चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या शुक्रवारी सकाळी अचानकपणे झालेल्या हवाई दौर्‍यामागील ‘राज’ काय होते, त्याचीच चर्चा महानगरातील राजकीय क्षेत्रात दिवसभर होती. नाशिकमध्ये महापौरांच्या बंधूची एका हत्या प्रकरणात चौकशी सुरू असतानाच अवघ्या दीड तासासाठी ते नाशकात कोणत्या कामासाठी आले असावेत, असे तर्कवितर्क लढविले जात होते. महापालिका वतरुळात तर महापौर पद बदलाची शक्यता असल्याचेही बोलले जाऊ लागले होते. दरम्यान, राज हे आपल्या खासगी दौर्‍यावर असल्याची माहिती आमदार वसंत गिते यांनी दिली.

फ्रावशी अकॅडमीच्या हेलिपॅडवर राज ठाकरे यांचे शुक्रवारी सकाळी 8 वाजता आगमन झाले. अवघा सव्वा ते दीड तास ते नाशकात थांबले आणि लगेच हेलिकॉप्टरने पुन्हा मुंबईकडे रवाना झाले. या दीड तासात राज यांच्यासमवेत मनसेचे नाशिकमधील केवळ तीन प्रमुख नेतेच उपस्थित होते. त्यामुळे या दौर्‍यात काय चर्चा झाली, त्याची कुठेच वाच्यता झालेली नाही. मात्र, याबाबत महापौर अँड. यतिन वाघ यांच्याशी संपर्क साधला असता राजसाहेबांचा हा खासगी दौरा असल्याचे त्यांनी सांगितले.

दौर्‍याबाबत इतकी गुप्तता राखण्याचे कारण काय?
या दौर्‍यात राज यांनी आमदार वसंत गिते, ‘मनसे’चे सरचिटणीस अतुल चांडक, महापौर यतिन वाघ, जिल्हाप्रमुख सचिन ठाकर, रतन लथ यांच्याव्यतिरिक्त कुणालाही दर्शन दिले नसल्याने इतकी गुप्तता का, असा प्रश्न उपस्थित होत होता. हा दौरा नाशिकच्या ‘राज’कारणाला कलाटणी देणारा ठरेल ही चर्चा होती. दरम्यान, मनसेच्या नेत्यांनी मात्र तसे काही नसल्याचे सांगत स्पष्ट बोलण्यास असर्मथता दर्शविली.

राजकीय वतरुळात बदलाच्या वार्‍याची चर्चा
गुंडगिरीचा बीमोड करण्याची भाषा करून गुंडांना पोसणार्‍यांवर राज यांनी कडाडून हल्ला चढविल्यामुळेच त्यांना नाशकात सत्तेची चव चाखता आली. मात्र, चांगले आणि सोनवणे हत्येत फिर्यादी पक्षाने महापौर वाघ यांच्या बंधूचे नाव घेतल्याने मनसेच्या प्रतिमेलाच तडा जाऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले. यामुळे या दौर्‍याने सत्तापद बदलाच्या तर्कवितर्कांना उधाण आले.

‘गोदापार्क’ची 30 मिनिटांत न्याहाळणी
महापालिकेतील युतीच्या सत्ताकाळात राज यांनी सुरू केलेला गोदापार्क प्रकल्प पुन्हा मार्गी लावण्यासाठीच शुक्रवारी त्यांनी एका जगविख्यात मराठी आर्किटेक्टसह नाशिकचा दौरा केल्याचे मनसेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. या दौर्‍यात त्यांनी गोदापार्क प्रकल्पाचे रुपडे कसे पालटता येईल आणि प्रदीर्घ काळ बाजूला पडलेला प्रकल्प कसा मार्गी लावता येईल, त्याबाबतची पाहणी आणि चर्चा केल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

राज यांनी सकाळी स्पॉट व्हिजिट केली तेव्हा त्यांनी बरोबर आलेल्या मुंबईतील जगविख्यात मराठी आर्किटेक्टला या प्रकल्पाचा पूर्वीचा प्लॅन आणि विद्यमान स्थितीबाबतचे वास्तव दाखविले. तसेच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काय करता येईल, याबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्यांनी चर्चादेखील केली. तसेच नाशिकमधील कुसुमाग्रज स्मारक आणि त्यासमोरील इतिहास संग्रहालयात काही अभिनव करणे शक्य आहे का, याबाबतही प्राथमिक स्तरावर चर्चा झाली.